

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची 'भारत जोडो यात्रा' सुरू झाली आहे. या माध्यमातून पक्ष पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपले मजबूत अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोललं जातंय. दरम्यान, राहुल गांधींच्या या यात्रेच्या मास्टर प्लॅनचा निर्णय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, किशोर आणि पक्षाकडून याबाबत काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील उदयपूर येथील चिंतन शिबिरात भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला होता. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, किशोर यांनी काँग्रेसला दिलेल्या उपाययोजनांमध्ये पदयात्रेची चर्चाही समाविष्ट असल्याचे मानले जात आहे.
प्रशांत किशोर हे एप्रिल महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, रणनीतीकारांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यादरम्यान सोशल मीडियावर जोरदार प्रेझेंटेशन सुरू होते. तथापि, द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत किशोर यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले 'ते' प्रेझेंटेशन फेक असल्याचे म्हणत काँग्रेस प्रवेशावरून सुरू असलेल्या चर्चेशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान, व्हायरल झालेल्या 'त्या' प्रेझेंटेशनमध्ये काँग्रेस पक्षाशी संबधीत एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखीत करण्यात आला होता. त्यात म्हटलं होतं की, 2014 पासून काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावर 24 तासांपेक्षा जास्त काळ चाललेले कोणतेही आंदोलन किंवा निदर्शन आयोजित केलेले नाही. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1990 मध्ये शेवटची 'भारत यात्रा' आयोजित केली होती.
विशेष म्हणजे नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी जूनमध्ये राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्यावर दिल्लीसह देशातील अनेक भागांत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. यानंतर सोनिया गांधी यांच्या चौकशीदरम्यानही हेच दृश्य पाहायला मिळाले.
स्वातंत्र्यदिनी पक्षाने आझादी गौरव यात्रा काढली. त्याआधीही पक्षाने वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जोरदार निदर्शने केली होती. या आंदोलनावेळी राहुल, प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला होता.
राजकीय पक्षांसाठी 'यात्रा' हे माध्यम खूप उपयुक्त ठरते असा आजपर्यंतचा इतिहास आहे. यात स्वातंपूर्व काळात महात्मा गांधींची दांडी यात्रा, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची कन्याकुमारी ते राजघाट यात्रा, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1990 मधील भारत यात्रा, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा आणि 2017 मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची पदयात्रा यांचा समावेश आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या वतीने काँग्रेसला काही महत्त्वचे सल्ले देण्यात आल्याचे वृत्त आहे. जसे की, पक्षावर निर्माण झालेले नेतृत्व संकट संपवावे लागेल, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर इतर पक्षांसोबतच्या आघाड्यांचा प्रश्नही सोडवावा लागेल. याशिवाय पक्षाला जुन्या आदर्शांकडे परतावे लागणार आहे. पक्षाने तळागाळातील नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र केले पाहिजे आणि संपर्क यंत्रणा सुधारली पाहिजे, असे सल्ले किशोर यांनी दिले असल्याची चर्चा आहे.