नितीश कुमारांच्या ‘मिशन २०२४’ला प्रारंभ , दिल्लीत भेटीगाठींचे सत्र | पुढारी

नितीश कुमारांच्या 'मिशन २०२४'ला प्रारंभ , दिल्लीत भेटीगाठींचे सत्र

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्ली दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (दि.६) आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल तसेच माकपचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली. २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा नितीश कुमार यांचा प्रयत्न आहे. त्यातूनच त्यांचे भेटीगाठींचे सत्र सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नितीन कुमार आणि केजरीवाल यांच्या भेटीदरम्यान आप नेते मनिष शिसोदिया तसेच संयुक्त जदचे नेते संजय झा हेही उपस्थित होते. नितीश कुमार यांनी ज्या अन्य नेत्यांची भेट घेतली, त्यात हरियानाचे माजी मुख्यमंत्री व इंडियन नॅशनल लोकदलचे नेते ओमप्रकाश चौताला, यांचा समावेश होता.

सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे सर्वात मोठी बाब ठरेल

सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान बनण्याची आपली कोणतीही इच्छा नाही तसेच आपण या पदाचे दावेदारदेखील नाही. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर तीच सर्वात मोठी बाब ठरेल, असे नितीश कुमार यांनी सांगितले.विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशाची घटना वाचविण्याची वेळ आली आहे, असे सीताराम येचुरी यांनी यावेळी सांगितले.

नितीश कुमार यांचे सोमवारी दिल्लीत आगमन झाले होते. आल्यावर सर्वप्रथम त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सुमारे तासभर भेट घेतली होती. विरोधी गोटाच्या नेतृत्वाच्या मुद्यावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे संयुक्त जदच्या नेत्यांनी त्या बैठकीनंतर सांगितले होते. भाजपविरोधात आघाडी उघडण्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली होती. नितीश कुमार हे पुढील दोन दिवसांत विरोधी गोटाच्या अन्य नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button