मुंबई महापालिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचे भाजपचे टार्गेट! | पुढारी

मुंबई महापालिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचे भाजपचे टार्गेट!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाला मुंबई महापालिका जिंकण्याचे मिशन दिले आहे. दोन्ही पक्षांनी मिळून १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. त्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहा यांना श्री गणेशाची मुर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे हे उपस्थित होते.

दरम्यान, भाजपाकडे नेहमीच कुठले ना कुठले मिशन असते, मात्र जनतेच्या मूळ समस्यांपासून ते मिसिंग असतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. भाजपाला आज काय लोटस मिशन उद्या काय दुसरे मिशन, पण जे खरे प्रश्न आहेत त्यापासून ते मिसिंग असतात. मराठी माणसांच्या अस्मितेपासून भाजपा दूर आहे. मुंबई महापालिकेवर असलेला शिवसेनेचा भगवा झेंडा कुणीही हलवू शकत नाही. मुंबईतील जातीपाती, सर्व धर्मीय माणसे यांना मुंबईत शांतता हवी आहे, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. शिवाजी पार्क हे शिवसैनिकांसाठी शक्तीस्थळ आहे. तिथूनच शिवसैनिकांना घोषणा मिळाल्या, विचार देण्यात आले. तिथूनच आंदोलन पेटली. तिथूनच देशाला दिशा देण्याचे काम करण्यात आले. म्हणून ती जागा आणि तो दिवस हा पूर्णपणे शिवसेनेचाच आहे, असेही सावंत म्हणाले.

Back to top button