पुण्याचा इंजिनिअर बनला ‘स्टारबक्स’चा सीईओ, लक्ष्मण नरसिम्हन यांचा सातासमुद्रापार डंका | पुढारी

पुण्याचा इंजिनिअर बनला 'स्टारबक्स'चा सीईओ, लक्ष्मण नरसिम्हन यांचा सातासमुद्रापार डंका

पुढारी डेस्क : जगातील सर्वात मोठी कॉफीहाऊस चेन असलेल्या स्टारबक्सने (Starbucks) भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन (Laxman Narasimhan) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. १ ऑक्टोबरपासून ते स्टारबक्सची सूत्रे हाती घेतील. हॉवर्ड शुल्ट्झ हे स्टारबक्सचे सीईओ होते. त्यांची जागा आता नरसिम्हन यांनी घेतली आहे. कंपनीने गुरुवारी नरसिम्हन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ते १ एप्रिल २०२३ रोजी कंपनी बोर्डात सामील होतील.

नरसिम्हन यांना जागतिक स्तरावरील अग्रगण्य ब्रँडमधील कामाचा ३० वर्षांचा अनुभव आहे. त्याच्याकडे ब्रँड विकसित करण्याचा अनुभव असून ग्राहक केंद्रित आणि डिजिटल नाविन्यपूर्ण कल्पना राबवून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असल्याचे Starbucks ने म्हटले आहे. ५५ वर्षीय नरसिम्हन यांनी लायसोल आणि एनफामिल बेबी फॉर्म्युला, ब्रिटनमधील रेकिट बेंकिसर ग्रुप पीएलसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

“आम्हाला खरोखरच विश्वास आहे की आम्हाला आमचा पुढील सीईओ म्हणून एक असाधारण व्यक्ती मिळाली आहे. ते एक टेस्टेड लीडर आहेत,” असे स्टारबक्स बोर्डाच्या अध्यक्षा मेलोडी हॉबसन यांनी म्हटले आहे.

या नियुक्तीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नरसिम्हन यांनी म्हटले आहे, “स्टारबक्सने जागतिक स्तरावर कॉफीचा एक प्रशंसनीय ब्रँड तयार केला आहे. अशा महत्त्वाच्या वेळी या प्रतिष्ठित कंपनीत रुजू होताना मला नम्र वाटत आहे, कारण भागीदार आणि ग्राहकांच्या अनुभवांमधील पुनर्शोध आणि गुंतवणुकीमुळे आज आपण ज्या बदलत्या मागण्यांचा सामना करतो त्या पूर्ण करण्यासाठी आणि आणखी मजबूत भविष्यासाठी आम्हाला स्थिर करण्यास सक्षम करतो.”

नरसिम्हन यांनी पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरींगचे पदवी शिक्षण घेतले आहे. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील द लॉडर इन्स्टिट्यूटमधून जर्मन आणि International Studies मधून एमए आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून फायनान्स विषयात एमबीए केले आहे.

स्टारबक्स कॉर्पोरेशन ही कॉफीहाऊसची अमेरिकन बहुराष्ट्रीय साखळी आहे. ज्याचे मुख्यालय सिएटल, वॉशिंग्टन येथे आहे.

Back to top button