दिल्लीचे उपराज्यपाल आप नेत्यांविरोधात करणार कायदेशीर कारवाई | पुढारी

दिल्लीचे उपराज्यपाल आप नेत्यांविरोधात करणार कायदेशीर कारवाई

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांवरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी घेतला आहे. उपराज्यपाल कार्यालयाकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली.

आम आदमी पक्षाच्या सौरभ भारद्वाज, आतिशी, दुर्गेश पाठक, जॅसमीन शाह आदी नेत्यांनी सक्सेना यांच्याविरोधात अतिशय अपमानास्पद तसेच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले असून या सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपराज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले. खादी ग्रामोद्योगचे चेअरमन असताना सक्सेना यांनी 1400 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता, असा गंभीर आरोप आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी गेल्या सोमवारी दिल्ली विधानसभेत केला होता. पाठक यांच्या आरोपांनंतर आप आमदारांनी पोस्टर आणि बॅनरबाजी करीत सक्सेना यांच्याविरोधात घोषणा दिल्या होत्या.

सक्सेना यांना अटक करावी अशी मागणी करतानाच ‘हमारा एलजी चोर है’ अशा घोषणा त्यावेळी देण्यात आल्या होत्या. आप च्या इतर नेत्यांनी देखील सक्सेना यांच्याविरोधात वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. या सर्वांच्या विरोधात आता उपराज्यपालांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपराज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Back to top button