Manish Sisodia: मनिष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची सीबीआयकडून झाडाझडती | पुढारी

Manish Sisodia: मनिष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची सीबीआयकडून झाडाझडती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: अबकारी कर घोटाळ्यात नाव आलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया  (Manish Sisodia) यांच्या गाझियाबाद येथील बँक लॉकरची झडती सीबीआयने मंगळवारी घेतली. सीबीआयला निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर जसे काही मिळाले नव्हते, तसे बँक लॉकरमध्येही त्यांना काही मिळाले नाही, असा दावा सिसोदिया यांनी केला आहे.

गाझियाबादमधील वसुंधरा भागात सिसोदिया (Manish Sisodia)  यांचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असून, येथे त्यांचे लॉकरही आहे. सीबीआयच्या पथकाने सकाळीच बँकेत जाऊन लॉकरची झडती घेतली. यावेळी स्वतः सिसोदिया आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. सीबीआय पथकाने आम्हाला चांगली वागणूक दिली आणि आम्हीही त्यांना सहकार्य केले, असे सांगतानाच अखेर सत्याचा विजय होईल, असे सिसोदिया यांनी नमूद केले.

 नॅशनल बँकेच्या शाखेसमोर मोठी गर्दी

सिसोदिया यांच्या बँक लॉकरची झडती सुरु असताना पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेसमोर लोकांची मोठी गर्दी झाली होती. झडती घेणाऱ्या सीबीआयच्या पथकात ५ अधिकाऱ्यांचा समावेश होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दिल्लीच्या अबकारी कर धोरणात बदल करुन मद्य विक्रेत्यांना तसेच मद्य कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा करुन दिल्याचा आरोप सिसोदिया यांच्यावर झाला आहे. या आरोपानंतर राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या शिफारशीनंतर सीबीआयने या प्रकरणाच्या चैकशीला सुरुवात केली होती. सीबीआयने यासंदर्भात ज्या लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, त्यात सिसोदिया यांचाही समावेश आहे. या प्रकरणी सीबीआयने १९ ऑगस्ट रोजी देशभरातील ३१ ठिकाणांवर धाडी देखील टाकल्या होत्या.

हेही वाचलंत का ? 

Back to top button