दिवाळीपासून सुरू होणार रिलायन्सची ‘5 जी’ सेवा | पुढारी

दिवाळीपासून सुरू होणार रिलायन्सची ‘5 जी’ सेवा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या दिवाळीत 5 जी मोबाईल सेवेची भेट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला.

रिलायन्सची ही 45 वी सर्वसाधारण सभा होती. या सभेत अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या 5 जी सेवेमध्ये दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. मुंबई, ठाणे, पुण्यासह देशातील चेन्नई व कोलकातासारख्या महत्त्वाच्या मेट्रो शहरांमध्ये दिवाळीत 5 जी मोबाईलची बेल वाजेल. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील मोबाईल 5 जी स्पीडने जोडले जातील, असे सांगून अंबानी म्हणाले, 5 जी चा प्रचंड वेग अनुभवायला मिळावा म्हणून आम्ही स्वतंत्र यंत्रणा उभारत आहोत. याचा अर्थ सध्याचे 4 जी नेटवर्क त्यासाठी अद्ययावत केले जाणार नाही. ते आहे तसेच राहील. पुढील दोन महिन्यांत म्हणजे दिवाळीत महत्त्वाच्या शहरांमध्ये 5 जी सेवा सुरू झालेली असेल. अत्यंत कमी वेळेत 5 जी सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स सज्ज असून त्यासाठी राष्ट्रव्यापी फायबरचे वायर नेटवर्क उभारण्यात आले आहे. मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांशी भागीदारी केल्यानंतर रिलायन्स आता क्वॉलकॉम कंपनीशीही भागीदारी करणार असून, या भागीदारीतून क्वॉलकॉम आणि जिओ संयुक्तपणे 5 जी तंत्रज्ञानाची नवनवी उत्पादने विकसित करणार आहे. सर्वांना परवडेल असा 5 जी स्मार्टफोन तयार करण्यासाठी आम्ही गुगलसोबत काम करत असल्याचेही अंबानी म्हणाले.

ईशा रिटेल सांभाळणार याच भाषणात मुकेश अंबानी यांनी आपल्या 222 अब्ज डॉलर्सच्या रिलायन्स साम्राज्याचे वारसही घोषित केले. यापूर्वी जिओच्या आगमनापासून सक्रिय झालेल्या कन्या ईशा यापुढे रिलायन्सचा रिटेल उद्योग सांभाळतील. सर्वात लहान मुलगा अनंत हा रिलायन्सचा ऊर्जा उद्योग सांभाळणार आहे.

अर्थव्यवस्थेचे कौतुक या सभेसमोर बोलताना अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे कौतुक केले. जगाच्या अनेक भागातील अर्थव्यवस्था मंदीच्या लाटेत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र छान उसळी घेत आहे, असे सांगून अंबानी म्हणाले, भौगोलिक राजकीय तणावामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. जागतिक तणाव जाणवत असतानाही विकास आणि स्थैर्य या दोन गोष्टी भारताच्या बाजूने बघायला मिळतात. एफएमसीजीमध्ये पदार्पण यावेळी ईशा अंबानी यांनी व्हॉटस्अ‍ॅप-जिओ मार्टची भागीदारी जाहीर करतानाच सांगितले की, याच वर्षात रिलायन्स जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत (एफएमसीजी) प्रवेश करत आहे. प्रत्येक भारतीयांच्या गरजेनुसार उत्पादने तयार करणे व ती घरपोच देणे हे या उद्योगाचे उद्दिष्ट असेल. वर्षभरात जीओ मार्ट हा ब्रँड आम्ही अधिक सशक्त केला. अनेक नवी उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध केली. आमच्या कोणत्याही स्टोअर्समधून 93 टक्के ऑनलाईन ऑर्डर्स अवघ्या सहा तासांत आम्ही घरपोच पाठवू शकतो. याचे कारण रिलायन्स डिजिटल आणि जिओ मार्ट यांचे संयुक्त सशक्त नेटवर्क हेच होय.

भारताची डिजिटल क्रांती आणखी वेगवान होणार रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत रिलायन्सने जिओ मार्टच्या माध्यमातून आधीच पाऊल टाकले आहे. आता त्यासाठी व्हॉटस्अ‍ॅप-जिओ मार्टची भागीदारी देखील अंबानी यांनी जाहीर केली. व्हॉटस्अ‍ॅपवर चॅट करत तुम्ही जिओ मार्टवर उपलब्ध असलेल्या वस्तूंची यादी पाहू शकाल, वस्तू निवडू शकाल, खरेदी करू शकाल आणि त्याचे बिलही व्हॉटस्अ‍ॅपवरच देऊ शकाल. भारताच्या डिजिटल क्रांतीला वेग देण्यासाठी फेसबुकची पालक कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म यांची भागीदारी म्हणून जिओ मार्ट व व्हॉटस्अ‍ॅप एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button