झारखंड : एकतर्फी प्रेमातून घरात घुसून १७ वर्षीय तरुणीला पेटवले; पीडितेच्या मृत्यूनंतर शहरात तणाव | पुढारी

झारखंड : एकतर्फी प्रेमातून घरात घुसून १७ वर्षीय तरुणीला पेटवले; पीडितेच्या मृत्यूनंतर शहरात तणाव

रांची; पुढारी ऑनलाईन : झारखंड मधील दुमका येथे एकतर्फी प्रेमातून एका नराधमाने १७ वर्षांच्या तरुणीस पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या भीषण घटनेनंतर लोक प्रचंड चिडले आहेत. दरम्यान रविवारी (दि. २८) उपचारा दरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यावर लोकांचा राग अनावर झाला आणि शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. पीडित तरुणीचे नाव अंकीता असे असून तिला २९ ऑगस्ट रोजी पेटविण्यात आले होते.

पीडित तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी दुमका शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. गेली दोन दिवस दुमका शहर पूर्णपणे बंद आहे, बाजार देखिल बंद होते. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी नागरिकांनी जिल्हा प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली. दुमका – भागलपूर रोड अनेक तासांसाठी जाम झाले होते. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपसह अन्य पक्ष व संघटना देखिल रस्त्यावर उतरले आहेत. तणावाची परिस्थिती पाहून शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

पीडित तरुणीने मृत्यूपुर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबनुसार, दि. २३ ऑगस्ट रोजी अंकीताही तिच्या स्वयंपाक घरात झोपली होती. तेव्हा तिच्या घराशेजारील तरुण शाहरुख हुसैन याने सुमारे पाचच्या दरम्यान खिडकीमधून पेट्रोल ओतून आग लावून दिली. तिने उठून पळण्याचा प्रयत्न केला पण, तिला खोलीतून बाहेर पडता आले नाही, कारण संपूर्ण खोलीत आग लागली होती. तिने खिडकीतून पाहिले तेव्हा शाहरुख हुसेन हा पेट्रोलचा कॅन घेऊन पळताना दिसला. या आगीत अंकीता मोठ्या प्रमाणात भाजली होती. तिच्या शेजाऱ्यांनी आग शमवून तिला दुमका येथील फुलो जानो या वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात दाखल केले होते.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. पाच दिवस पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. अखेर ती अपयशी ठरली आणि रविवारी तिचा मृत्यू झाला. अंकिताच्या मृत्यूनंतर लोक रस्त्यावर उतरले व दुमका येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली. या घटनेबाबत झारखंड सरकारने दुर्लक्ष झाल्याचे स्विकार केले आहे.

आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी सर्व माध्यामांसमोर सरकारकडून चूक झाल्याचे कबूल केले आहे. त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवर ही अंत्यत क्रूर घटना असल्याचे नमूद केले. या शिवाय गुप्ता पुढे म्हणाले, पीडित मुलगीही त्यांच्या बहिणी प्रमाणे आहे. आरोपीला या प्रकरणी फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. या प्रकरणी झारखंड सरकार कठोर कारवाई करेल असे म्हणत अशा संवेदनशील घटने बाबत राजकारण होता कामा नये असे देखील ते म्हणाले.

Back to top button