Jharkhand CM : हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द होणार ? कोण होणार झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री ? | पुढारी

Jharkhand CM : हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द होणार ? कोण होणार झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री ?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व धोक्‍यात आले आहे. सोरेन यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा गैरवापर केला असून त्‍याचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द करावे का, याबाबत राज्‍यपालांनी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागवले होते. निवडणूक आयोगाने याप्रकरणी हेमंत सोरेन यांचेही मत जाणून घेतले. यानंतर अहवाल सादर केला. हेमंत साेरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द करण्‍याची शिफारस आयाेगाने केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्‍यास झारखंडमध्‍ये मोठे राजकीय संकट येवू शकते. जाणून घेवूया काय आहे संपूर्ण प्रकरण? सोरेन यांचे सदस्‍यत्‍व रद्‍द झाल्‍यास कोण होणार झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री ? या विषयी..

काय आहे प्रकरण ?

झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांच्‍यावर मुख्‍यमंत्रीपदाचा गैरवापर केल्‍याचा आरोप आहे. मुख्‍यमंत्री असतानाही त्‍यांच्‍या नावावर कोळसा खाणी असल्‍याचा आरोप आहे. याप्रकरणी सोरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द करावे का, याबाबत राज्‍यपालांनी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मावले होते.  निवडणूक आयोगाने आज (दि. २५) आपला अहवाल सादर केला. मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, निवडणूक आयोगाने सोरेन यांचे सदस्‍यत्‍व रद्‍द करण्‍याची शिफारस केली आहे.

सोरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द होणार ?

प्रतिनिधित्‍व अधिनियम कलम ९ (अ) नुसार मुख्‍यमंत्री सोरेन यांच्‍यावरील आरोप गंभीर आहेत. मुख्‍यमंत्रीपदावर असतानाही त्‍यांच्‍या नावावर काेळसा खाणी असल्‍याचा आराेप आहे. निवडणूक आयोगाला या आरोपांमध्‍ये तथ्‍य आढळल्‍यानेच त्‍यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द करण्‍याची शिफारस करण्‍यात आले आहे. आता या प्रकरणी राज्‍यापल काेणता निर्णय घेतात याकडे झारखंडचे लक्ष वेधले आहे. तसेच भ्रष्‍टाचार प्रकरणी हेमंत साेरेन दोषी आढळल्‍यास त्‍यांना पाच वर्ष निवडणूक लढविता येणार नाही.

झारखंडच्‍या राजकारणात काय बदल होणार?

विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द झाल्‍यास हेमंत सोरेन यांना मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा द्‍यावा लागेल. राज्‍यात नवे सरकार स्‍थापन होईल. हेमंत सोरेन यांच्‍या झारखंड मुक्‍ती मोर्चा (जीएमएम) पक्षाचे आमदार नवीन नेत्‍याची निवड करतील. झारखंडमध्‍ये जीएमएम, काँग्रेस, राजद आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षांच्‍या आघाडीचे सरकार आहे. त्‍यामुळे ‘जीएमएम’ला नेत्‍याची निवड करताना सर्व मित्रपक्षांशी चर्चा करावी लागेल.

कोण होणार ‘जीएमएम’ पक्षाचे नवा नेता ?

काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हेमंत सोरेन हे आपली पत्‍नी कल्‍पना सोरेन यांना मुख्‍यमंत्री करतील, असे सूचक विधान केले होते. सोरेन यांचे पिता व शिबू सोरेन त्‍यांच्‍यावर विविध खटले सुरु आहेत. तसेच त्‍यांची प्रकृतीही ठिक नसते. त्‍यामुळे जर सोरेन यांचे विधानसभा सदस्‍यत्‍व रद्‍द झाल्‍यास त्‍यांच्‍या पत्‍नी कल्‍पना सोरेने मुख्‍यमंत्री होतील, असे मानले जात आहे. मात्र या निर्णयासाठी पक्षातील आमदारांचे एकमत होणे आवश्‍यक आहे. अशीही चर्चा आहे की, कल्‍पना यांची मुख्‍यमंत्रीपदी निवड केल्‍यास पक्षातील ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची नाराजी सोरेन यांना सहन करावी लागणार आहे. तसेच कल्‍पना सोरेन यांचे नाव जमीन खरेदी घोटाळात असून विरोधी पक्षही त्‍याची मुख्‍यमंत्रीपदी निवड झाल्‍यास आक्रमक होवू शकतो, असे मानले जात आहे.

सोरेन कुटुंबाबाहेरील नेत्‍याला संधी मिळणार ?

सोरेन मंत्रीमंडळातील दोन नावेही मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीमध्‍ये आहेत. यामध्‍ये झारखंडचे परिवहन मंत्री चंपई सोरेन आणि महिला व बाल विकास मंत्री जोबा मांझी यांची नावे आघाडीवर आहेत. हे दोन्‍ही नेते हेमंत सोरेन यांचे निकटवर्ती मानले जातात. त्‍यांना संधी मिळेल, अशीही चर्चा आहे.

 

 

 

Back to top button