CBI vs Manish Sisodia : सिसोदिया यांच्यासह 13 जणांना देश सोडण्यास बंदी, CBI कडून लुक आऊट नोटीस जारी!
पुढारी ऑनलाईन डेस्क : अबकारी धोरणावरून वादात सापडलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 13 जणांना देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सीबीआयने या सर्वांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली आहे. शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या पथकाने मनीष सिसोदियाशी संबधीत विविध ठिकाणी छापे टाकले. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयने छापेमारीत कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले आहेत. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे समजते आहे.
सीबीआयच्या कारवाईनंतर मनीष सिसोदिया आणि आप पक्षाचे नेते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. सिसोदिया यांनी ट्विटवर पीएम मोदी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत टोला लगावत म्हटलंय की, 'भाजप आणि सीबीआयच्या छाप्यांबाबत मोदीजींचे हे विधान जरूर ऐका. तुम्ही ऐकले नाही, तर तुम्हाला खूप मोठे सत्य जाणून घेण्यापासून वंचित राहावे लागेल.' सिसोदिया पुढे म्हणतात की, 'हळूहळू ऋतू बदलत राहतात, वाऱ्यांनाही तुमचा वेग पाहून आश्चर्य वाटते, सर…'.
सिसोदिया यांच्या निकटवर्तीयाच्या कंपनीला कथितपणे 1 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. तर सिसोदिया म्हणाले की त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही आणि ते सीबीआय तपास आणि छापे यांना घाबरत नाही.

