Grenade Terror Attack : स्वातंत्र्य दिनापूर्वी दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, कुलगाममध्ये पोलीस शहीद | पुढारी

Grenade Terror Attack : स्वातंत्र्य दिनापूर्वी दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, कुलगाममध्ये पोलीस शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये आता रात्री उशिरा दहशतवादी हल्ले करत आहेत. शनिवारी रात्री कुलगामच्या कैमोहमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला, ज्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला. ताहिर खान असे मृत पोलिस कर्मचा-याचे नाव असून ते पूंछमधील मेंढार येथील असल्याचे समजते आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले पण त्याआधीच दहशतवादी पळून गेले होते. दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील कैमोह येथे शनिवारी रात्री ग्रेनेड हल्ल्याची घटना घडली. या दहशतवादी घटनेत पुंछमधील मेंढर येथील ताहिर खान नावाचा पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यांना उपचारासाठी अनंतनागच्या जीएमसी हॉस्पिटलमध्ये तत्काळ नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

यापूर्वी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील इदगाह भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला. श्रीनगर पोलिसांनी ट्विट केले होते की, अली जान रोड, इदगाह येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले, त्यात एक सीआरपीएफ जवान किरकोळ जखमी झाला.

तत्पूर्वी, सुरक्षा दलांनी राजौरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला हाणून पाडला होता. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. तर लष्कराच्या तीन जवानांना प्राण गमवावे लागले. सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफलमॅन मनोज कुमार आणि रायफलमन लक्ष्मणन डी यांनी गुरुवारी सकाळी ऑपरेशन दरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button