2024 मध्ये राहुल-सोनिया गांधी वगळता हे पाच चेहरे ठरू शकतात नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी मोठे आव्हान | पुढारी

2024 मध्ये राहुल-सोनिया गांधी वगळता हे पाच चेहरे ठरू शकतात नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी मोठे आव्हान

पुढारी ऑनलाईन: बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर भाजपविरोधातील विरोधकांच्या प्रचाराला आता नवसंजीवनी मिळाली आहे. विरोधकांची ही ताकद 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपसाठी आव्हान ठरू शकते, असे मानले जात आहे. मात्र, विरोधक किती खंबीरपणे आणि किती लवकर एकजूट राहू शकतात, हे त्या परिस्थितीवर अवलंबून असेल. पण 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय रथ रोखू शकणाऱ्या राजकीय चेहऱ्यांमध्ये चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह काही माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.

नितीश कुमार-लालू यादव:

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्यापैकी 17 जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत जेडीयू-आरजेडी आणि काँग्रेसकडे आता 19 खासदार आहेत. या तिन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी बघितली तर ती 44.87 टक्के एवढी होते, जी भाजपच्या (23.58) मतांच्या टक्केवारीच्या जवळपास दुप्पट आहे. सध्या, एलजेपी (7.86%) देखील भाजपसोबत आहे. परंतु काका-पुतण्याच्या लढतीत पक्ष दोन भागात विभागला गेला आहे.

2019 ची निवडणूक जरी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात लढली गेली आणि जेडीयूसुद्धा त्यांच्यासोबत होती. पण 2024 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणूक लढवली जाईल तेव्हा नितीश भाजपसोबत नसतील. 2015 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे दोन दिग्गज नितीश कुमार आणि लालू यादवांसह काँग्रेस, हम आणि डावेही त्यांच्या विरोधात असू शकतात. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडी-जेडीयू आणि काँग्रेस आघाडीला 41.9 टक्के मते मिळाली होती, तर भाजपला 24.4 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर जीतन राम मांझी यांच्या हम आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीचा एनडीए आघाडीत समावेश करण्यात आला, ज्यांना अनुक्रमे 2.3 आणि 2.6 टक्के किंवा 4.9 टक्के मते मिळाली. आता हे दोन्ही पक्ष एनडीएमधून बाहेर पडले आहेत. याशिवाय डाव्यांनाही 3 टक्के मते मिळाली आहेत. हे सर्व एकत्र केले तर सुमारे 45 टक्के मते महाआघाडीच्या खात्यात येऊ शकतात. असे झाले तर 2024 मध्ये बिहारमध्ये भाजपची मोठी अडचण होऊ शकते.

ममता बॅनर्जी:

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणारी दुसरी मोठी व्यक्ती या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत, ज्या सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या टीएमसीला एकूण 48.02 टक्के मते मिळाली होती, तर ज्यांनी त्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती, त्या भाजपला 27.81 टक्के मते मिळाली होती. 42 लोकसभा सदस्य असलेल्या बंगालमध्ये 2019 च्या निवडणुकीत टीएमसीला एकूण 43.3 टक्के मते मिळाली, तर मोदी लाटेत भाजपला 40.7 टक्के मते मिळाली. काँग्रेसला 5.67 आणि डाव्यांना 6.33 टक्के मते मिळाली. 2024 मध्ये संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजुटीने निवडणूक लढवली तर भाजपच्या सध्याच्या लोकसभा खासदारांची संख्या 18 च्या खाली जाऊ शकते. 2019 मध्ये भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या.

केसीआर:

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) हे अनेक दिवसांपासून पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेद इतके टोकाचे आहेत की, केसीआरही पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी हैदराबादला गेले नाहीत. पीएम मोदींची टीमही त्यांना उत्तर देण्यात मागे नाही. अगदी अलीकडे पंतप्रधान आणि अमित शहा यांनी मिशन दक्षिण अंतर्गत हैदराबादवर जोर वाढवला आहे.

केसीआर यांना बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांची तिसरी आघाडी करत 2024 मध्ये पंतप्रधान मोदींची जादू कमी करायची आहे. त्यासाठी त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांशी संपर्कही साधला, मात्र सध्या तरी त्यांना या मोहिमेत यश येईल असे दिसत नाही. मात्र, 2024 च्या निवडणुकीत केसीआर पुन्हा भाजपला अडचणीत आणू शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही केसीआर यांनी तेलंगणात स्वबळावर एकूण 46.9 टक्के मते मिळवली होती, तर भाजप आघाडीला केवळ 7.1 टक्के मते मिळाली होती. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला 28.4 आणि एआयएमआयएमला 2.7 टक्के मते मिळाली. 2018 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही केसीआरच्या टीआरएसला 41.29 टक्के, काँग्रेसला 29.48 टक्के आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 19.45 टक्के मते मिळाली होती. तेलंगणात लोकसभेच्या एकूण 17 जागा आहेत.

एमके स्टॅलिन :

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एमके स्टॅलिन हे तमिळनाडूमध्ये भाजपच्या मार्गातील मोठा अडथळा आहेत. या राज्यात 39 लोकसभेच्या जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डीएमके आणि काँग्रेसच्या युतीने 38 जागा जिंकल्या होत्या आणि त्यांना 33.53 टक्के मते मिळाली होती, तर भाजप आणि एआयएडीएमके युतीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. या आघाडीला 19.39 टक्के मते मिळाली. यात मोठी गोष्ट म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुक-काँग्रेस आघाडीला एकही जागा मिळाली नव्हती

शरद पवार-उद्धव ठाकरे:

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवारही महाराष्ट्रात भाजपसाठी अडचणी निर्माण करू शकतात. 2024 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र लढू शकतात, असे मानले जाते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपने 23 आणि मित्रपक्ष शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. दोन्ही पक्षांना अनुक्रमे 27.84 आणि 23.5 टक्के मते मिळाली, तर स्वतंत्रपणे लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 16 आणि 15.66 टक्के मते मिळाली. बदललेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत आता शिवसेना आता एनडीएसोबत नाही, अशा स्थितीत 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये एनडीएच्या मतांमध्ये फूट पडण्याचा धोका आहे.

याशिवाय झारखंडमध्ये सीएम हेमंत सोरेन यांचा पक्ष जेएमएम, उत्तर प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सपा पक्ष हे देखील भाजपसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात. कारण दोन्ही राज्ये बिहारला लागून आहेत आणि तिथली राजकीय हवाही नितीश आणि लालू एक झाल्यामुळे बदलू शकते.

Back to top button