महाराष्ट्राच्या सत्‍तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, 22 ऑगस्टला होणार सुनावणी | पुढारी

महाराष्ट्राच्या सत्‍तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, 22 ऑगस्टला होणार सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : महाराष्ट्राच्या सत्‍तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून सर्वोच्च न्यायालयाने आता 22 ऑगस्ट ही नवी तारीख दिली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्टला सेवानिवृत्‍त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत या प्रकरणाचा निकाल लागणार की भावी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा निकाल लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी अचानक बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात एकमेकांविरोधात विविध स्वरुपाच्या याचिका दाखल केल्या होत्या. सरन्यायाधीश रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण दाखल आहे. गत सुनावणीवेळी न्यायालयाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, असे केंद्रीय निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर 8 तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार होती, तथापि ती 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता 12 तारखेला सुनावणी होणार नसून ती 22 ऑगस्टला घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्‍ता संघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात एकूण सहा याचिका प्रलंबित आहेत. या सर्व याचिका एकत्रित करुन त्या घटनापीठाकडे देण्याबाबतचा निर्णय पुढील सुनावणीवेळी होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण आणखी बरेच लांबण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिंदे व ठाकरे गटाला आपणच शिवसेना आहोत, हे सिध्द करण्यासाठी आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. गत 8 तारखेपर्यंत यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे गटाने पुरावे व कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला जावा, अशी विनंती आयोगाकडे केली होती. आयोगाने ही विनंती मान्य केली होती. या पार्श्‍वभूमीवर भविष्यात आयोग कोणता निर्णय घेते, ते पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

Back to top button