नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आठव्यांदा घेतली शपथ, तेजस्वी यादव बनले उपमुख्यमंत्री

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आठव्यांदा घेतली शपथ, तेजस्वी यादव बनले उपमुख्यमंत्री
Published on
Updated on

पाटणा; पुढारी ऑनलाईन : बिहारमध्ये जदयुने (जनता दल युनायटेड) भाजपशी फारकत घेऊन 'राजद'सोबत सरकार स्थापन केले आहे. यामुळे भाजपला मोठा धक्‍का बसला आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या राजद (RJD) आणि इतर विरोधी पक्षांसोबत नवीन "महाविकास आघाडी" जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले.

बिहारमध्ये जदयुने भाजपशी काडीमोड घेतला आहे. त्यांनी आता 'राजद'सोबत (राष्ट्रीय जनता दल) नवा घरोबा केला आहे. जदयुचे भाजपसोबत संबंध ताणले गेले होते. अखेर ते तुटले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच 'राजद'चे नेते तेजस्वी लालूप्रसाद यादव यांच्याशी त्यांनी चर्चा केली. दोन्ही नेत्यांकडून त्यांना पाठिंब्याचा शब्द देण्यात आला. राज्यपालांच्या भेटीपूर्वी नितीशकुमार यांनी आपल्या पक्षांच्या खासदारांची, आमदारांची बैठक घेतली होती. बैठकीत जो निर्णय ते (नितीशकुमार) घेतील, तो सर्वांना मान्य असेल, यावर सर्वसंमती झाली. नंतरच त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

नितीश कुमार यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागलेल्या भाजपसाठी बिहारमधील राजकीय घटनाक्रम चिंतेत टाकणारा आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत, हे त्याचे कारण.

गत विधानसभेतील स्थिती

– २०२० मध्ये नितीशकुमार यांच्या जदयुला गत निवडणुकीच्या तुलनेत २८ जागा कमी मिळाल्या होत्या. भाजपला गत निवडणुकीच्या तुलनेत २१ जागा जास्तीच्या मिळाल्या होत्या.
– जदयुच्या ४३, तर भाजपच्या ७४ जागा असूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. 'एनडीए'ला १२५, तर महाआघाडीला ११० जागांवर विजय मिळाला होता.

गत अन् आगामी 'लोकसभा'

– गत लोकसभा निवडणुकीत ४० पैकी भाजपला १७, जदयु १६, तर 'लोजप'ला (लोकजनशक्ती पक्ष) ६ जागा मिळाल्या होत्या. राजद खातेही उघडू शकला नव्हता.

– आता नितीशकुमार यांनी वेगळी चूल मांडल्याने २०२४ मध्ये भाजपला बिहारमध्ये अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागेल.

– राजद, जदयु, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची महाआघाडी २०२४ मध्ये भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.

भाजपमधून बाहेर पडण्याची कारणे काय?

– नितीश कुमार यांच्याऐवजी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असावा, ही मागणी बर्‍याच दिवसांपासून भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांकडून केली जात होती. त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ होतेच. त्यात माजी केंद्रीय मंत्री आर. सी. पी. सिंह यांच्या बेनामी संपत्तीचे प्रकरण समोर आल्यानंतर हे मतभेद अधिकच तीव्र बनले.

– गेल्या काही महिन्यांपासून नितीश कुमार यांनी भाजप नेत्यांना भेटणे बंद केले होते. पंतप्रधानांनी कोरोनासंदर्भात बोलावलेल्या बैठकीलाही ते हजर राहिले नव्हते. एवढेच काय, तर मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभालाही ते गैरहजर होते. दुसरीकडे विषारी दारू प्रकरणावरून चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धारेवर धरलेले आहे. चिराग यांना भाजपची फूस असल्याचा संशय नितीशकुमार यांना होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news