बिहारात भाजप-जदयू सरकार संकटात? | पुढारी

बिहारात भाजप-जदयू सरकार संकटात?

पाटणा; वृत्तसंस्था : बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जदयू युती तुटण्याच्या मार्गावर आहे. येत्या 11 ऑगस्टपर्यंत हे दोन्ही पक्ष वेगळी चूल मांडतील आणि राज्यात जदयू-राजद युतीचे सरकार स्थापन होऊ शकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या सर्व खासदारांना व आमदारांना पुढील दोन दिवसांत पाटणा येथे दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘राजद’नेही (राष्ट्रीय जनता दल) हालचाली वाढविल्या असून, आपल्या सर्व आमदारांना पाटण्यातच राहण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. 11 ऑगस्टपर्यंत राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकेल. मंगळवारी त्यासाठी तेजस्वी यादव आपल्या पक्षाच्या (राजद) सर्व आमदारांसोबत बैठक घेतील. अर्थात राजद नेत्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. सगळ्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत.

झंझारपूरचे जदयू खासदार रामप्रीत मंडल यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्याने या वृत्ताला बळ मिळाले असून मंडल यांनी, बिहारच्या राजकारणात सर्व शक्य असल्याचे म्हटलेले आहे. आम्ही पाटण्याला पोहोचू, तोवर नितीशकुमार यांनी कदाचित आपला निर्णय जाहीरही केलेला असेल, असेही मंडल यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नितीशकुमार यांनी भाजप नेत्यांना भेटणे बंद केले आहे. पंतप्रधानांनी कोरोनासंदर्भात बोलावलेल्या बैठकीलाही ते हजर राहिले नव्हते. एवढेच नव्हे तर मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभालाही ते अनुपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री आर. सी. पी. सिंह यांच्या बेनामी संपत्तीचे प्रकरण समोर आल्यानंतर हे मतभेद अधिकच तीव्र बनले आहेत.

दुसरीकडे विषारी दारू प्रकरणावरून चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धारेवर धरलेले आहे. चिराग यांना भाजपची फूस असल्याचा संशय नितीशकुमार यांना आहे.

महाआघाडीकडे सध्या 110 जागा

2020 मध्ये नितीशकुमार यांच्या जदयूला गत निवडणुकीच्या तुलनेत 28 जागा कमी होत्या. भाजपला 21 जागा जास्तीच्या मिळाल्या होत्या. जदयूच्या 43, तर भाजपच्या 74 जागा असूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले होते. ‘एनडीए’ला 125, तर महाआघाडीला 110 जागांवर विजय मिळाला होता.

…तर आम्ही तयार : राजद

मुख्यमंत्री नितीशकुमार हे पुढाकार घेणार असतील, तेजस्वी यादव यांच्याकडे त्यांचा स्वत:हून तसा प्रस्ताव असेल तर आमची युतीला केव्हाही तयारी आहे, असे राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी सांगितले.

Back to top button