योगी आदित्यनाथ सरकारमधील दोन बड्या मंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार; जाणून घ्या काय आहे प्रकरण… | पुढारी

योगी आदित्यनाथ सरकारमधील दोन बड्या मंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार; जाणून घ्या काय आहे प्रकरण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील राकेश सचान आणि संजय निषाद हे दोन बडे मंत्री अडचणीत आले आहेत. या दोन मंत्र्यांवर वेगवेगळ्या गुन्ह्यात अटकेची टांगती तलवार आहे. गोरखपूरच्या सीजेएम कोर्टाने संजय निषाद यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तर राकेश सचानला 31 वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दरम्यान, सचान पसार झाले असून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

राकेश सचानवर काय आरोप आहेत ?

राकेश सचान सध्या योगी मंत्रिमंडळात खादी, ग्रामोद्योग, रेशीम, हातमाग आणि वस्त्रोद्योग मंत्री आहेत. न्यायालयाने त्यांना अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शनिवारी दोषी ठरवले आहे. दरम्यान, राकेश सचानला शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या वकिलाच्या मदतीने तो शिक्षेच्या आदेशाची मूळ प्रत घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे सचानविरोधात न्यायालयाच्या रीडरने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे.

कोण आहेत राकेश सचान?

राकेश सचान कानपूरचे रहिवासी असून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात समाजवादी पक्षातून केली. 1993 आणि 2002 मध्ये ते घाटमपूर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये त्यांनी फतेहपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते कानपूर देहाटच्या भोगनीपूर मतदारसंघातून आमदार आहेत.

मंत्री संजय निषाद यांच्यावर कोणता गुन्हा ?

राकेश सचन यांच्यानंतर कॅबिनेट मंत्री संजय निषाद हेही अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले आंदोलन चिघळले होते. या दरम्यान जमावाला भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. निषाद यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोरखपूरच्या सीजेएम न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांना अटक करून 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

 निषाद जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी 2015 मध्ये सहजनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारवाल येथे आंदोलन करण्यात आले होते. यादरम्यान जमावाने हिंसक वळण घेतले होते. यावेळी पोलिसांची गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर आंदोलन अधिक हिंसक झाले. आंदोलकांनी पोलिसांच्या अनेक गाड्या जाळल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या संजय निषाद यांच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर 21 डिसेंबर 2015 रोजी निषाद यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. 2016 मध्ये ते जामिनावर बाहेर आले होते.

दरम्यान, या दोन मंत्र्यांच्या प्रकरणावर समाजवादी पक्षाने योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप सरकारचे मंत्री गुन्हेगार असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते भूपेंद्र श्रीवास्तव पीयूष यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी या मंत्र्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पीयूष यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button