कोरोना महारोगराईमुळे रखडलेल्या कृषी गणनेला सुरुवात; यंदा स्मार्टफोन, टॅबलेटचा वापर | पुढारी

कोरोना महारोगराईमुळे रखडलेल्या कृषी गणनेला सुरुवात; यंदा स्मार्टफोन, टॅबलेटचा वापर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महारोगराईमुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कृषी गणनेला सुरुवात झाली आहे. दर पाच वर्षांनी देशात कृषी गणना केली जाते. ऑगस्ट २०२२ पासून कृषी गणनेचे प्रत्यक्ष कार्य सुरु होईल,असे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच या गणनेसाठी स्मार्टफोन, टॅबलेटचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑपरेशनल होल्डिंगचा आकडा आणि क्षेत्र, त्यांचा आकार, वर्गवार वितरण, जमीन वापर, भाडेकरार आणि पीक पद्धतीसह इतर सूक्ष्म पातळीवर विविध कृषी मापदंडांवर माहिती मिळवण्यासाठी ही गणना केली जाते. यंदा कृषी गणनेचे डेटा संकलन प्रथमच स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर केले जाईल. बहुतांश राज्यांनी त्यांच्या जमिनीची नोंदी आणि सर्वेक्षणासाठी डिजिटायझेशन केले आहे. कृषी गणनेच्या डेटाच्या संकलनाला त्यामुळे गती मिळेल असे म्हटले जात आहे.

भारतासारख्या विशाल आणि कृषीप्रधान देशात या गणनेमुळे मोठा फायदा होईल. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या राहणीमानात परिवर्तन घडवण्याबरोबरच लहान शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना संघटित करणे, त्यांना फायदेशीर पिकांकडे आकर्षित करणे आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असेही मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी गणनेचा प्रारंभ करताना व्यक्त केले.

    हेही वाचलंत का ?

 

Back to top button