नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे चाळीस आमदार फोडण्यासाठी भाजपने ८०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केला.
प्रत्येक आमदारासाठी २० कोटी अशा प्रकारे ८०० कोटी रुपये भाजपने बाजूला काढून ठेवले आहेत. हे आठशे रुपये कोणाचे आहेत, कुठे ठेवले आहेत, हे देश जाणू इच्छित आहे, असा टोला मारतानाच केजरीवाल यांनी आमचा एकही आमदार फुटणार नाही. सरकार स्थिर आहे व दिल्लीत सुरू असलेली सर्व चांगली कामे यापुढेही चालू राहतील, असे अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.
भाजप आणि आम आदमी पक्षादरम्यान सुरू असलेल्या कलगीतुर्याच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलाविली होती. बैठकीस ६२ पैकी ५४ आमदार उपस्थित होते. सात आमदार दिल्लीबाहेर असल्याने, तर हवाला प्रकरणात अडकलेले मंत्री सत्येंद्र जैन हे ईडीच्या कस्टडीत असल्याने बैठकीस हजर राहू शकले नाहीत. दरम्यान, केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाटवर जाऊन काही मिनिटे मौनव्रतही बाळगले.
सिसोदियांनी केजरीवालांना किती कमिशन दिले? : भाजप
एकीकडे आम आदमी पक्षाकडून भाजपविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेला असताना दुसरीकडे भाजपने 'आप'वर पलटवार केला आहे. मनिष सिसोदिया यांनी केजरीवाल यांना किती कमिशन दिले, केजरीवाल मद्य सम्राटांना वाचविण्यासाठी का बेचैन झाले आहेत, केजरीवाल यांना इतके खोटे का बोलावे लागत आहे, मनिष सिसोदिया यांच्या चोरीपासून इतरत्र लक्ष वेधण्याचा प्रयत्न केजरीवाल का करीत आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केली. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी 'आप'वर टीका करताना म्हणाल्या की, आम्हाला आम आदमी पक्षास तोडण्याची गरज नाही. त्यांचे कुकर्मच त्यांना तोडेल.