कॅन्सर, मधुमेहावरील औषधे होणार स्वस्त! | पुढारी

कॅन्सर, मधुमेहावरील औषधे होणार स्वस्त!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कॅन्सर, मधुमेह आणि हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी आवश्यक औषधांच्या किमतीत 70 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून लवकरच केली जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी सरकारने काही प्रस्तावही तयार केले असून घोषणेबाबत अंतिम निर्णय होणेेच आता बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे गंभीर आजारांचा सामना करणार्‍या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारला काही महत्त्वाच्या पान औषधांच्या चढ्या किमतींबद्दल चिंता आहे आणि ते नियंत्रित करण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरूआहेत. आता प्रस्तावाला मंजुरी मिळताच या महागड्या औषधांच्या किंमती 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये सुधारणा करण्यासाठीदेखील काम करत आहे.

केंद्र सरकार दीर्घ कालावधीसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांवर उच्च-व्यापार मार्जिन मर्यादित करण्याचा विचार करत आहे. अंतिम प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी 26 जुलै रोजी फार्मा उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही औषधांवरील व्यापार मार्जिन 1000 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सध्या 355 पेक्षा जास्त औषधांच्या किमती नियंत्रित केल्या जातात. यात प्रामुख्याने अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे.

औषधांवरील व्यापार मार्जिन घाऊक विक्रेत्यांसाठी 8 टक्के आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी 16 टक्केवर देखील नियंत्रित केले जाते. या औषधांच्या सर्व उत्पादकांना त्यांचं उत्पादन जास्तीत जास्त किमतीत किंवा त्याहून कमी किमतीला विकावे लागते. अशा औषधांची किंमत केवळ 10 टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते. अनेकदा अशा औषधांवरील व्यापार मार्जिन खूप जास्त असते आणि त्यामुळे रुग्णांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. प्रायोगिक तत्त्वावर 41 कॅन्सरप्रतिबंधक 41 औषधांचे व्यापार मार्जिन 30 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आले आहे. परिणामी या औषधांच्या 526 ब्रँडच्या कमाल किरकोळ किमतीत मोठी घट झाली आहे.

Back to top button