Karnataka Politics | बी. एस. येडियुराप्पा यांची राजकीय निवृत्ती, पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा

Karnataka Politics | बी. एस. येडियुराप्पा यांची राजकीय निवृत्ती, पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा

शिमोगा; पुढारी ऑनलाईन : भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (BS Yediyurappa) यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. (Karnataka Politics) पुढील विधानसभा निवडणुकीत शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी लोकांना शिकारीपुरा येथील जागेवर त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. "मी निवडणूक लढवणार नाही. मी तुम्हाला आवाहन करतो की विजयेंद्र यांना पाठिंबा द्या. कारण तुम्ही एवढी वर्षे मला पाठिंबा दिला आहे," असे येडियुराप्पा यांनी शुक्रवारी शिकारीपूर तालुक्यातील अंजनापुरा येथे एका सभेला संबोधित करताना म्हटले.

कर्नाटकातील सत्तेत असलेल्या भाजप सरकारमध्ये त्यांना डावलले जात असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर एका दिवसानंतर लगेच येडियुराप्पा यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

"२०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री नसेल. आम्ही तो होऊ देणार नाही. केवळ भाजपचा उमेदवार मुख्यमंत्री होईल," असे येडियुराप्पा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचा संदर्भ देत येडियुराप्पा म्हणाले, "काँग्रेसचे नेते उतावीळ झाले होते आणि निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री होण्याविषयी बोलत होते. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद सुरू आहेत आणि नेते मुख्यमंत्री होण्यासाठी झगडत आहेत. हे सर्वांना माहित आहे. कर्नाटकात भाजप पुन्हा सत्तेवर येईल." काही आमदारांना निवडून आणण्याची क्षमता त्यांच्या मुलामध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजपमध्ये पंच्याहत्तरी ओलांडलेल्यांना मंत्रिपद किंवा महत्त्वाचे पद देण्यात येत नाही. या नियमानुसार येडियुराप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. सध्या येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय असलेले आणि लिंगायत समजाचे नेते बसवराज बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पहात आहेत. तर विजयेंद्र हे २०२० पासून कर्नाटक भाजपचे राज्य उपाध्यक्ष आहेत. (Karnataka Politics)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news