SBIने सुरू केले व्हॉटसअप बँकिंग; विविध सेवा मिळणार व्हॉटसअपवर | पुढारी

SBIने सुरू केले व्हॉटसअप बँकिंग; विविध सेवा मिळणार व्हॉटसअपवर

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) बँकिंग सेवा आता व्हॉटसअपवरही (WhatsApp)मिळणार आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वतंत्र नंबर ग्राहकांसाठी जारी केला आहे. “तुमची बँक आता व्हॉटसअपवर आहे. अकाऊंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट अशा सुविधा आता तुम्ही व्हॉटसअपवरही मिळवू शकता,” अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ट्वीटरवर दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची या सेवा खालील प्रकारे मिळवता येतील. यासाठी WAREG हा संदेश त्यानंतर स्पेस देऊन आपला स्टेट बँक ऑफ इंडियातील आपले खाते क्रमांक टाईप करा आणि हा संदेश ७२०८९३३१४८ या नंबरवर पाठवा. मेसेज पाठवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करा. अशा प्रकारे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्हॉटसअप बँकिंगसाठी रजिस्टर व्हाल.

त्यानंतर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ९०२२६९०२२६ या क्रमांकावरून मेसेज येईल. हा नंबर तुम्ही सेव्ह करू शकता. या मेसेजला तुम्ही उत्तर दिल्यानंतर तुम्हाला स्टेट बँकेच्या कोणत्या सेवा व्हॉटसअपवर आहेत, त्याची यादी व्हॉटसअपमध्ये मिळेल. तुम्हाला जी सेवा हवी आहे, तो नंबर मेसेज म्हणून सेंड करा. त्यानंतर आपल्याला हवी ती माहिती मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डधारकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेत खात्याची माहिती, रिवॉर्ड पॉईंटस, बॅलन्स, थकित रक्कम यांचीही माहिती मिळते. ही सेवा सुरू करण्यासाठी कार्डधारकांनी ९००४०२२०२२ या क्रमांकावर OPTIN हा मेसेज पाठवायचा आहे.

हेही वाचा

Back to top button