नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी पाकमधून आलेल्या घुसखोरास अटक | पुढारी

नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी पाकमधून आलेल्या घुसखोरास अटक

जयपूर, पुढारी ऑनलाईन : सीमा सुरक्षा दलाने राजस्थानातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करत असलेल्या पाकिस्तानातील मंडी बहाउद्दीन येथील रिझवान अशरफ या घुसखोराला अटक केली होती. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वक्‍तव्य केल्यावरून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याच्या इराद्याने रिझवान भारतीय हद्दीत दाखल झाला होता, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), ‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) तसेच लष्करी अधिकार्‍यांचे संयुक्‍त पथक रिझवानची कसून चौकशी करत आहे.

रिझवान याला 16 जुलै रोजी पकडण्यात आले होते. रात्री 11 च्या सुमारास श्रीगंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या ‘हिंदूमलकोट बॉर्डर फेंसिंग’लगत रिझवानच्या संशयास्पद हालचाली टिपून गस्ती पथकाने त्याला ताब्यात घेतले होते. गस्ती पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 11 इंची धारदार चाकू, इस्लामी पुस्तके, नकाशा आणि टिकतील असे खाद्यपदार्थ आढळून आले होते.

चौकशीत त्याने स्वत:चे नाव (रिझवान) व पाकिस्तानातील गाव (मंडी बहाउद्दीन) सांगितले. नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी मी भारतीय हद्दीत दाखल झालो, अशी कबुलीही त्याने दिली. नुपूर शर्मा यांची हत्या करण्यापूर्वी तो अजमेर शरीफ येथे जाणार होता. सीमा सुरक्षा दलाने रिझवानला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी रिझवानला न्यायालयात हजर केले असता त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. सीमा सुरक्षा दलाने घुसखोरीला दुजोरा दिला. पण अन्य कुठलीही माहिती याबाबत देण्यास नकार दिला. रिझवानने चौकशीत काय सांगितले, त्याची माहिती देता येणार नाही, असे पोलिस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले.

Back to top button