उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते, पण संजय राऊतांनी खोडा घातला : राहुल शेवाळे | पुढारी

उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते, पण संजय राऊतांनी खोडा घातला : राहुल शेवाळे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या १२ खासदारांच्या स्वतंत्र गटाचे गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१९) दिल्ली येथील पत्रकार परिषदेत दिली. तसेच भाजप शिवसेना युती होण्याबाबत जून महिन्यात चर्चा सुरू झाली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेही युतीसाठी तयार होते, चार वेळा चर्चाही झाली होती. परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीमध्ये खोडा घातला, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी केला.

शिवसेनेच्या १२ खासदारांनी ‘शिवसेना लोकसभा गट’ तयार करून लोकसभा अध्यक्षांकडे रितसर पत्र दिले आहे.या गटाचे नेते राहुल शेवाळे तसेच मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी असतील. भावना गवळी यांचा व्हिप सर्व सदस्यांसाठी लागू राहील,असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेतून केले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित सर्व १२ खासदारांचे शिंदे यांनी स्वागत केले. बाळासाहेबांचे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेवून राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन केले. राज्यातील ५० आमदारांनी जी भूमिका घेतली, तिच भूमिका खासदारांनी घेतल्याने त्यांचे मनापासून स्वागत करतो.लाखो मतदारांचे नेतृत्व करणाऱ्या खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारावर ही भूमिका घेतली आहे. लोकसभा अध्यक्षांना यासंबंधी पत्र देण्यात आले असल्याचे देखील ते म्हणाले.राज्यातील लोकांसाठी जेवढे काही चांगले कार्य करता येईल ते हे सर्वसामान्य लोकांचे सरकार करेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ५० आमदारांच्या भूमिकेचे समर्थन राज्यभरातील शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांसह महाराष्ट्रातील जनतेने केले आहे.शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. अडीच वर्षांपूर्वीच युतीचा निर्णय घ्यायला हवा होता,असा पुनरोच्चार शिंदे यांनी केला. सरकारने अनेक चांगले निर्णय तातडीने घेतले आहे. प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा पुर्ण पाठिंबा मिळत आहे. केंद्राच्या मदतीनेच राज्याचा विकास वेगाने होतो, असे शिंदे म्हणाले.

आम्हीच शिवसेना आहोत. एकनाथ शिंदे गटनेते आहेत. लोकशाहीत कायदा महत्वाचा असतो.घटना असते.त्याच्या बाहेर जाता येत नाही. घटनाबाह्या काम आम्ही केलेले नाही, लोकशाहीत आकड्यांना महत्व आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.मंत्रिमंडळ विस्तार तसेच केंद्रातील वाट्यासंबंधी शिंदे यांना विचारले असता यासंबंधी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सुचक वक्तव्य करीत त्यांनी अधिक बोलणे टाळले. शिवसेना खासदार दबाबामुळे शिंदे गटात सामिल होत असल्याचा दावा संजय राउत यांनी केला होता.पंरतु, यासंबंधी इतर कुणी बोलले असते तर त्याची दखल घेतली असती. आता राउत यांचा सकाळचा शो बंद झाला आहे. त्यांची दखल घ्यावी असे काही नाही, असा टोला शिंदे यांनी लगावला.

शिवसेना अद्यापही एनडीएच मध्येच-खा.राहुल शेवाळे

केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडताना तत्कालीन मंत्री अरविंद सावंत यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. एनडीएमधून बाहेर पडत असल्याचे कुठलेही पत्र पक्षाकडून देण्यात आले नव्हते. शिवाय शिवसेनेने यूपीएमध्ये सामिल होत असल्याचे पत्र देखील दिलेले नाही. त्यामुळे शिवसेना एनडीएमध्येच आहे,असा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला.पुर्वीचे गटनेते विनायक राउत यांच्याबद्दल खासदारांमध्ये नाराजी होते. पदाला न्याय देण्यात ते अपयशी ठरले. गटनेता बदला, अशी सातत्याने विनंती केली. पंरतु, ती मान्य करण्यात आली नसल्याचे शेवाळे म्हणाले.

शिवसेना-भाजप युतीसाठी मोदी-ठाकरेंमध्ये तासभर चर्चा

उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांला समर्थन देणार असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट करीत भाजप शिवसेनेसोबत युती करण्यासाठी अनुकुल होते.पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे यांनी स्वत: भेटून तासभर चर्चा केली होती.जुन २०२१ मध्ये ही चर्चा झाली होती. पंरतु, युतीची बोलणी सुरू असतांना विधानसभेतून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले.भाजप पक्षश्रेष्ठी त्यामुळे नाराज झाल्याने युतीची चर्चा थांबल्याचा गौप्यस्फोट शेवाळे यांनी केला.शिवसेनेच्या नेत्यांविरोधातील उमेदवारांना विरोधकांनी ताकद दिली. या काळात शिंदे यांनी सहकार्य केले.मात्र पक्षाने वेळ दिला नाही.आमदारांनी घेतलेल्या बैठीनंतर खासदारांच्या बैठकीत शिंदे मुख्यमंत्री झाले तर स्वागत करु,अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. युती करण्याची इच्छा आहे.पंरतु, अनेकदा प्रयत्न करून देखील भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत आता खासदारांनीच प्रयत्न करावे, अशी भावना ठाकरेंनी व्यक्त केली होती, असेही शेवाळे म्हणाले.खासदारांच्या दबवानंतरच पक्षप्रमुखांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button