शिवसेनेला पुन्हा खिंडार; १२ खासदार शिंदे गटात?; ठाकरेंना दुसरा धक्‍का | पुढारी

शिवसेनेला पुन्हा खिंडार; १२ खासदार शिंदे गटात?; ठाकरेंना दुसरा धक्‍का

पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि ते त्यांच्या गटात जाण्याची दाट शक्यता आहे. सुत्रांकडून दिलेल्‍या माहितीनुसार, १२ खासदार आज रात्री दिल्लीला जातील. आणि ते तेथेच याबाबत घोषणा करतील.

दरम्‍यान, एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असून तेथे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री झालेपासून शिंदेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. याआधी शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ८ आणि ९ जुलै रोजी नवी दिल्लीला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या अन्य नेत्‍यांची भेट घेतली होती.

शिंदे यांच्या संपर्कात जवळपास १२ खासदार आहेत. यामध्ये धैर्यशील संभाजीराव माने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव गणपतराव जाधव, कृपाराव गवळी, कृपाराव जाधव, तुळशी पाटील अशी या खासदारांची नावे आहेत.

खासदार संजय राऊत म्‍हणाले…

दिल्‍ली येथे बोलताना खासदार संजय राऊत म्‍हणाले की, हा कॉमेडी एक्सप्रेस सीझन २ आहे. शेवटी शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे आणि तोच राहिल. तर फुटलेल्या या गटाला कोणतीही अधिकृत मान्यता नाही. असे राऊत म्‍हणाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालय २० जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाबाबतच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. न्यायालयात आतापर्यंत पाच याचिका दाखल झाल्‍या आहेत. यामध्ये पहिली याचिका शिंदे गटाने उन्हाळी सुट्टीत दाखल केली होती. जेव्हा काही बंडखोर सेनेचे आमदार उपसभापतींनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान दिले होते.

सुट्टीतील खंडपीठाने बंडखोर आमदारांना उपसभापतींच्या अपात्रतेच्या नोटिसीला लेखी उत्तरे दाखल करण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. सरन्यायाधीश एन व्ही रमणा आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने उद्धव ठाकरे गटाकडून या प्रकरणांची तातडीची यादी आणि सुनावणी होणे आवश्यक आहे अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती.

Back to top button