’25 किलोपेक्षा जास्त ‘पॅक’ असलेल्या खाद्यान्नावर GST लागणार नाही’ | पुढारी

'25 किलोपेक्षा जास्त ‘पॅक’ असलेल्या खाद्यान्नावर GST लागणार नाही'

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : 25 किलोच्या वर पॅक असलेल्या खाद्यान्नावर वस्तू आणि सेवाकर (GST) लागणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारकडून सोमवारी देण्यात आली. गहू, तांदूळ, डाळी, पीठ अशा सर्व प्रकारच्या खाद्यान्नासाठी ही सवलत असेल. 25 किलो अथवा 25 लीटरच्या वरील खाद्यान्नाचा समावेश ‘प्रि-पॅकेज्ड आणि लेबल्ड कमोडिटीज’ मध्ये केला जाणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

25 किलो वजनाच्या पिठाच्या पॅकवर नियमाप्रमाणे पाच टक्के जीएसटी (GST) कर लागू असेल पण 30 किलो वजनाच्या पॅकसाठी हा कर लागू असणार नाही, असे उदाहरण सरकारकडून देण्यात आले आहे. जीएसटी परिषदेच्या 29 जून रोजी झालेल्या बैठकीत ‘प्रि-पॅकेज्ड आणि लेबल्ड कमोडिटीज’ वर जीएसटी कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली आहे. जीएसटी परिषदेने त्यावेळी ज्या अन्य वस्तूंवर कर लावला होता, त्यात विविध प्रकारचे पेन्सिल शार्पनर्स, शाई, चाकू, चमचे, एलईडी दिवे, सोलर वॉटर हिटर, पंप्स आदींचा समावेश होता.

Back to top button