जयललितांच्या पक्षात ‘युद्ध’ : पन्नीरसेल्वम यांची हकालपट्टी, ईपी पलानीस्वामी नवीन ‘बॉस’ | पुढारी

जयललितांच्या पक्षात 'युद्ध' : पन्नीरसेल्वम यांची हकालपट्टी, ईपी पलानीस्वामी नवीन ‘बॉस’

चेन्नई, पुढारी ऑनलाईन : तामिळनाडूतील प्रमुख राजकीय पक्ष अण्णाद्रमुक (AIADMK) मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दुहेरी नेतृत्व मॉडेलला संपवून, ईपीएस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईके पलानीस्वामी यांची आज (दि. 11) पक्षाचे अंतरिम सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते ओ पनीरसेल्वम (OPM) यांची पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्यात आली आहे.

अण्णाद्रमुकमधील वर्चस्वाच्या लढाईत माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना हा मोठा झटका आहे. खरे तर मद्रास उच्च न्यायालयाने AIADMK च्या जनरल कौन्सिलच्या सभेला मान्यता दिल्यानंतर एडप्पाडी के. पलानीस्वामी यांची पक्षाच्या अंतरिम सरचिटणीस म्हणून निवड झाली. बैठकीत, AIADMK च्या जनरल कौन्सिलने सरचिटणीस पद बहाल करण्याचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यांद्वारे एका व्यक्तीची निवड सुनिश्चित करण्याचा ठराव मंजूर केला. 4 महिन्यांनी निवडणूक होणार आहे. याशिवाय पक्षातील दुहेरी नेतृत्व संपुष्टात आणून पक्षासाठी उपसरचिटणीस पद निर्माण करण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. आज (दि. 11) सकाळी मद्रास उच्च न्यायालयाने या बैठकीला मंजुरी दिल्याने पन्नीरसेल्वम यांना मोठा धक्का बसला. या निर्णयानंतरच त्यांचा पराभव निश्चित मानला गेला.

अण्णाद्रमुक पक्षाच्या अडीच हजारांहून अधिक सदस्य असलेल्या जनरल कौन्सिलने सर्वोच्च नेते म्हणून ईके पलानीस्वामी यांना पक्ष चालवण्याचे अधिकार दिले आहेत. पलानीस्वामी आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी पनीरसेल्वम यांच्यावर सत्ताधारी DMK राजवटीला अनुकूल असल्याचा आणि AIDMK कमकुवत करण्याचा आरोप केला आहे.

बैठकीत सरचिटणीस निवडीसाठी पक्षाने चार महिन्यांत संघटनात्मक निवडणुका घेण्याचा औपचारिक ठराव केला. अनेक उपनियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्यात पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी लढण्यासाठी नवीन निकष समाविष्ट आहेत. यापैकी एका नियमात असे म्हटले आहे की, पक्षाचे 10 वर्षे प्राथमिक सदस्यत्व असलेली व्यक्तीच निवडणूक लढवू शकते.

मद्रास उच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतरच जनरल कौन्सिलची बैठक सुरू झाली. हायकोर्टाने राजकीय पक्षाच्या वादात न्यायालयाचा हस्तक्षेप न करण्यावर शिक्कामोर्तब करताना अण्णाद्रमुकचे नेते आणि माजी समन्वयक ओ. पनीरसेल्वम यांची (OPS) जनरल कौन्सिलच्या बैठकीला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी फेटाळली. जनरल कौन्सिलच्या सभेला आव्हान देणारी दुसरी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली होती. कायद्यानुसार बैठक होऊ शकते, असे न्यायमूर्तींनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर एआयएडीएमकेच्या जनरल कौन्सिलच्या बैठकीचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांनी केले. यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत ई.के. पलानीस्वामी यांची हंगामी सरचिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर पक्षाचे नेते ओ. पनीरसेल्वम यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली.

हकालपट्टीनंतर प्रतिक्रिया देताना पनीरसेल्वम म्हणाले की, मला पक्षाच्या 1.5 कोटी कार्यकर्त्यांनी समन्वयक म्हणून निवडले होते आणि पलानीस्वामी किंवा इतर कोणत्याही नेत्याला त्यांची हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही. मी याविरोधात कोर्टात जाईन, असा इशारा त्यांनी दिला.

Back to top button