जगातील हे लोकप्रिय नेतेही यापूर्वी बनले लक्ष्य! | पुढारी

जगातील हे लोकप्रिय नेतेही यापूर्वी बनले लक्ष्य!

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्या हत्येनंतर जगभरात लोकप्रिय असलेल्या नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. अ‍ॅबे यांच्यापूर्वी भारतासह विविध देशांतील अशा लोकप्रिय नेत्यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या घडवून आणल्याची अनेक उदाहरणे आहेत, पैकी दहा नेत्यांविषयी…

जॉन एफ केनेडी

अमेरिकेचे 35 वे आणि सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेल्या जॉन एफ. केनेडी यांची 22 नोव्हेंबर 1963 रोजी टेक्सासमधील डल्लास शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पत्नी नेली कॉनली यांच्यासोबत एका खुल्या कारमधून नागरिकांचे अभिवादन स्वीकारत असताना हा प्रकार घडला होता. उपचारादरम्यान केनेडी यांचा मृत्यू झाला. अमेरिकेत सर्वात लोकप्रिय ठरलेल्या अध्यक्षांपैकी ते एक होते. त्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ आजही कायम आहे.

अब्राहम लिंकन

अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष असलेल्या अब्राहम लिंकन यांची 15 एप्रिल 1865 रोजी वॉशिंग्टनमधील एका नाट्यगृहात हत्या करण्यात आली होती. नाट्य कलाकार जॉन वाइक्स बूथ याने नाटक पहात असलेल्या लिंकन यांच्या डोक्यात मागून गोळी घातली. हत्येच्या चार दिवसांपूर्वी लिंकन यांनी कृष्णवर्णीयांना मताधिकार देण्याची वेळ आल्याचे वक्‍तव्य केले होते.

ओलोफ पाल्मे

दोनदा स्वीडनचे पंतप्रधानपद भूषविणार्‍या ओलोफ पाल्मे यांची 28 फेब्रुवारी 1986 रोजी सेंट्रल स्टॉकहोल मार्गावर गोळ्या झाडून हत्या
झाली होती. पाल्मे आपल्या पत्नी आणि मुलासह चित्रपटगृहातून परतत असताना हा प्रकार घडला होता.

मार्टिन ल्यूथर किंग

कृष्णवर्णियांच्या अधिकारांसाठी मोठा लढा उभारणारे मार्टिन ल्यूथर किंग यांची 4 एप्रिल 1968 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ‘अमेरिकेचे गांधी’ म्हणून त्यांना ओळखले जात. त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

महात्मा गांधी

जगाला अहिंसेचा मार्ग दाखविणार्‍या महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिर्ला भवनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. एकदिवस प्रार्थनेसाठी जाताना नथूराम गोडसेने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

इंदिरा गांधी

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी दिल्लीतील सरकारी निवासस्थानात हत्या करण्यात आली. त्यांचे
अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनीच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

राजीव गांधी

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी 21 मे 1991 रोजी तमिळनाडूतील श्रीपेरुमबुदूरमध्ये निवडणूक रॅलीकरीता आले होते. तमिळ लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या एका महिलेने बाँबसह स्वत:ला उडवून दिले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

बेनझीर भुट्टो

दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषविणार्‍या बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 मध्ये हत्या केली होती. रावळपिंडीतील एक रॅलीदरम्यान आत्मघाती हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मुस्लिम देशाचे सर्वोच्चपद भूषविणार्‍या भुट्टो या पहिल्याच महिला होत्या.

आर्चड्युक फर्डिनांड

ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचे उत्ताराधिकारी असलेल्या आर्चड्युक फर्डिनांड यांना 28 जून 1914 रोजी गोळ्या घातल्या होत्या. पत्नीसोबत ते बोस्नियास्थित साराएवो दौर्‍यावर आले होते. तेथे एका कार्यक्रमात घडलेली ही घटना पहिल्या महायुद्धाची नांदी मानली जाते.

शेख मुजीब उर रेहमान

बांग्लादेशचे पहिले पंतप्रधान असलेल्या शेख मुजीब उर रेहमान यांची 15 ऑगस्ट 1975 रोजी राष्ट्रपती भवनातच कुटुंबासह हत्या करण्यात आली होती.

Back to top button