राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेकडून भावना गवळींची लोकसभा प्रतोदपदावरून उचलबांगडी! राजन विचारे यांची नियुक्ती | पुढारी

राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेकडून भावना गवळींची लोकसभा प्रतोदपदावरून उचलबांगडी! राजन विचारे यांची नियुक्ती

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना खासदार भावना गवळी (bhavana gawali) यांना लोकसभा प्रतोद पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी खासदार राजन विचारे यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याच्या विधीमंडळाला देखील मोठा धोका बसला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे.

शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी (bhavana gawali) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका उचलून धरली होती. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी (bhavana gawali) यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवले आहे. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

18 तारखेपासून अधिवेशन

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. याच दिवशी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यातील बंडाचा फटका पुन्हा बसू नये हे लक्षात घेत शिवसेनेने निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा निर्णय घेतला आहे. द्रौपदी मुर्मू या भाजप पुरस्कृत एनडीएच्या उमेदवार आहेत, तर युपीएने यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवले आहे.

यातच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करावे, अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. यामुळे खबरदारी म्हणून की काय भावना गवळी यांची प्रतोदपदावरुन हकालपट्टी करत ठाण्यात शिवसेना मजबूत करण्याकडे शिवसेनेने लक्ष दिल्याचे दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Back to top button