दिल्लीमध्ये शुक्रवारपर्यंत पोहोचणार मान्सूनचा पाऊस | पुढारी

दिल्लीमध्ये शुक्रवारपर्यंत पोहोचणार मान्सूनचा पाऊस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कडक उष्णतेचा त्रास सोसत असलेल्या दिल्लीकरांसाठी हवामान खात्याने एक चांगली बातमी दिली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी मान्सूनचा पाऊस पोहोचणार असल्याचे हवामान खात्याने अहवालात म्हटले आहे.

मध्य भारतात बहुतांश ठिकाणी मान्सून पोहोचला असला तरी उत्तर भारतात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. वाढणाऱ्या उष्णतेमुळे उत्तर भारतातले लोक हैराण झाले आहेत. अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाऱ्याची स्थिती अनुकूल असून गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पुढील दोन दिवसांत मान्सूनच्या पावसाचे आगमन होऊ शकते, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर भारतात राजस्थानमधील फालोदी येथे गेल्या चोवीस तासात सर्वाधिक ४५.४ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले होते. दिल्लीमध्ये सध्या दमट हवा असून कमाल तापमान ४०.९ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दि. ३० जून रोजी हलक्या वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये २९ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते, पण नंतर त्याची वाटचाल धिम्या गतीने झाली. येत्या काही दिवसांत मात्र, देशाच्या सर्व भागात मान्सूनचा पाऊस पोहोचेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button