घाऊक बाजारात साबुदाणा, शेंगदाणा महागला | पुढारी

घाऊक बाजारात साबुदाणा, शेंगदाणा महागला

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा :  एपीएमसी घाऊक बाजारात साबुदाणा, शेंगदाणा किलोमागे पाच रुपयांनी महागला आहे. यामुळे आषाढी एकादशीला साबुदाण्याला असलेली वाढती मागणी पाहता आणखी दोन ते तीन रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता साबुदाणा घाऊक व्यापारी माणिपुरा स्टॉर्च प्रोडक्ट कंपनीचे व्यापारी राजूभाई यांनी वर्तवली आहे.

मुंबई एपीएमसीत दररोज साबुदाणाचे चार ते पाच ट्रक खप आहे. म्हणजे सुमारे 100 टन साबुदाणा विक्री केला जातो. उपवासाच्या सणात म्हणजे श्रावण, आषाढी एकदशी या दिवसात आवक दुप्पट होते. दररोज 10 ते 12 ट्रक साबुदाणा मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात विक्री होतो. त्याचपटीने शेंगदाण्याची विक्री होते.

घाऊक बाजारात गेल्या महिन्यांत साबुदाणा 40 ते 42 रुपये किलो होता. तर आता 45 ते 50 रुपये किलो आहे. हाच साबुदाणा किरकोळ बाजारात 100 रुपये किलो आहे. शेंगदाणे घाऊकला 105 रुपये तर किरकोळला 160 रुपये किलो आहे. म्हणजे घाऊकपेक्षा किरकोळ बाजारातील दर हे दुप्पट झाले आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातून शेंगदाण्याची आवक होते.

तर साबुदाणा हा केवळ एकाच राज्यातून येतो. एपीएमसीत गेल्या वर्षी 25 मेला 26 रुपये किलो साबुदाणा होता. आता 25 जूनला 50 रुपये किलोवर पोहचला आहे. सोमवारी 25 क्विंटल एवढी साबुदाण्याची आवक झाली. तर शेंगदाणे 25 मेला 100 रुपये किलो होते. तर आवक 503 क्विंटल एवढी होती. 25 जूनला आवकमध्ये वाढ होऊन 537 क्विंटल एवढी झाली. तर बाजारभाव 105 रुपये किलो झाला. म्हणजेच पाच रुपयांची दरवाढ झाली.

साबुदाण्याची तामिळनाडू राज्यातील सेलम येथून आवक होते. हे एकमेव राज्य साबुदाणा उत्पादनात आहे.डॉल्फिन, सर्वोत्तम, गुलाब, वनलक्ष्मी, डॉलर आणि महालक्ष्मी या ब्रँडचा साबुदाणा बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये डॉलरला अधिक मागणी आहे.

आषाढी एकादशीपर्यंत साबुदाणा आणखी महागण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात 50 रुपये विक्री होणार्‍या साबुदाण्याच्या दरात दोन ते तीन रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचे घाऊक व्यापारी सांगतात. या उपवासाच्या काळात 10 ते 12 ट्रक साबुदाणा विक्री होतो. सध्या पाहिजे तसा उठाव नसल्याचे घाऊक व्यापारी राजू भाई यांनी सांगितले. किरकोळ बाजारात आषाढीला साबुदाणा दरात सुमारे 8 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Back to top button