Maharashtra Crisis : पवार आणि फडणवीस यांच्या दिल्लीतील हालचालींकडे सर्वांचे लक्ष; पवार करणार कायदे तज्ज्ञांशी चर्चा? | पुढारी

Maharashtra Crisis : पवार आणि फडणवीस यांच्या दिल्लीतील हालचालींकडे सर्वांचे लक्ष; पवार करणार कायदे तज्ज्ञांशी चर्चा?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील राजकीय संकट गडद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे रविवारी दिल्लीत आगमन झाले असून भाजपविरोधी आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण दिल्लीला आलो आहोत, असे पवार यांनी दिल्ली विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान मागील काही दिवसात तीनवेळा गुप्तपणे दिल्ली दौरा केलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्ली दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पवार आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात कोणत्या घडामोडी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी आघाडीने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलेली आहे. यशवंत सिन्हा हे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता संसद भवनात आपला अर्ज भरणार आहेत. यावेळी पवार उपस्थित राहणार आहेत. पवार यांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीतच सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पवार यांनी आपण सिन्हांचा अर्ज भरण्यासाठी आलो आहोत असे म्हटले असले तरी राज्यातील राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने ते कायदेतज्ज्ञांची ते भेट घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाविकास आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी पवार यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असून गुवाहाटीला गेलेले आमदार परत येतील’ असे त्यांनी सांगितले आहे. ‘आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरे यांना आहे. आसामला गेलेले आमदार जेव्हा परत येतील. तेव्हा त्यांच्यासोबत बैठक करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल, असेही पवार यांनी दिल्ली विमानतळावर स्पष्ट केले. दिल्लीला येण्याआधी पवार यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण तसेच शिवसेना नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांची भेट घेतली होती. दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू आहे. भाजपने आपल्या मोहीमा अत्यंत गुप्त ठेवल्या असून फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी खलबते करणार असल्याचे समजते.

हेही वाचा

Back to top button