

British Royal Navy F-35 stealth jet Kerala emergency landing moved Thiruvananthapuram
तिरुअनंतपुरम : ब्रिटनच्या अत्याधुनिक एफ-35 बी स्टेल्थ फायटर जेटने गेल्या महिन्यात त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर तांत्रिक कारणांमुळे आपत्कालीन लँडिंग केली होती. या जेटच्या दुरुस्तीसाठी 24 जणांची ब्रिटिश टीम आज केरळमध्ये दाखल झाली.
या टीममध्ये 14 अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञ असून उर्वरित 10 जण विमान कर्मचार्यांचे सदस्य आहेत. ही टीम विमानाचे संपूर्णपणे परीक्षण करणार असून तेथेच दुरुस्ती शक्य आहे का, की जेट पुन्हा ब्रिटनमध्ये न्यायला हवे, यावर निर्णय घेणार आहे.
केरळमध्ये रविवारी उतरलेले Airbus A400M Atlas विमान सायंकाळी 3.30 वाजता परत जाणार असले तरी, तांत्रिक तज्ज्ञ केरळमध्ये थांबून दुरुस्तीचं काम पाहणार आहेत.
ब्रिटनच्या हाय कमिशनने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "यूकेचे अभियंते त्रिवेंद्रम विमानतळावर दाखल झाले असून, ते आवश्यक उपकरणांसह आले आहेत. विमानाचे निरीक्षण व दुरुस्ती करण्याचे काम लवकरच सुरू होईल."
यूकेने भारत सरकारने दिलेल्या MRO फॅसिलिटीचा स्वीकार केला असून, स्थानिक प्रशासन व भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चेअंती अंतिम कार्यपद्धती ठरवण्यात येईल.
एफ-35बी जेट अत्यंत आधुनिक असून त्याच्या अवजड व क्लिष्ट संरचना लक्षात घेता, Airbus A400M सारखं मध्यम आकाराचं विमान ते परत नेण्यासाठी अपुरं ठरतं. त्यामुळे ब्रिटन मोठ्या क्षमतेचं C-17 Globemaster विमान पाठवण्याची शक्यता आहे.
तथापि, जर हायड्रॉलिक यंत्रणा व इतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करता आले, तर हे विमान परत उड्डाण करू शकते, असं ब्रिटिश सूत्रांनी सांगितलं आहे.
त्रिवेंद्रम विमानतळावर उभं असलेलं हे एफ-35बी जेट नागरिकांमध्ये आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. केरळ पर्यटन विभाग, मिल्मा (दूध सहकारी संस्था), केरळ पोलिस, AIDS नियंत्रण संस्था, तसेच अनेक खासगी कंपन्यांनी या जेटचे फोटो आणि मीम्स शेअर करून त्याचा विनोदी वापर केला.
ब्रिटनच्या हाय कमिशनने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "भारतीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या मदतीसाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत."
हा प्रकार केवळ तांत्रिक संकट नसून, भारत-ब्रिटन संबंधांमध्ये सहकार्याचं एक नवीन उदाहरण म्हणूनही पाहिला जात आहे.