‘अग्‍निपथ’मध्ये आठवी उत्तीर्ण विद्यार्थांनाही करता येईल अर्ज | पुढारी

‘अग्‍निपथ’मध्ये आठवी उत्तीर्ण विद्यार्थांनाही करता येईल अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था :  ‘अग्‍निपथ’साठीची हवाईदलाची अधिसूचना जारी झाल्यानंतर लगोलग लष्करानेही या योजनेंतर्गत भरतीसाठीची अधिसूचना तसेच मार्गदर्शक नियमावली सोमवारी जारी केली. एक जुलैपासून भरतीसाठीची नोंदणी सुरू होणार आहे. अधिसूचनेनुसार लष्करात अग्‍निवीरपदासाठी
अग्‍निवीर जनरल ड्युटी, अग्‍निवीर टेक्निकल, अग्‍निवीर क्लार्क, अग्‍निवीर ट्रेडस्मॅन (10 वी पास), अग्‍निवीर ट्रेडस्मॅन (8 वी पास) या पाच ग्रेडमध्ये अग्‍निवीर भरती होणार आहे. अधिसूचनेत पात्रता, अटी, प्रक्रिया, वेतन-भत्ते, सेवेचे नियम आदी सविस्तर तपशील नमूद आहे. ‘ऑनलाईन रजिस्ट्रेशन’साठी क्षेळपळपवळरपरीाू.पळल.ळप या संकेतस्थळावर जावे लागेल. अग्‍निवीर दलासाठी लष्करात एक वेगळीच रँक असेल. लष्कराच्या कुठल्याही विद्यमान रँकशी ती संबंधित नसेल.

अग्‍निवीर गणवेशावर नियमित सैनिकांपेक्षा वेगळी ओळख पटविणारा असा एक वेगळा बिल्ला असेल. अठरापेक्षा कमी वय असलेल्यांना भरतीसाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल. वेतनाशिवाय गणवेश भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता मिळेल. सीएसडी कँटिन सुविधा असेल. वर्षातून 30 सुट्ट्या असतील. आजारपणाच्या वेगळ्या सुट्ट्या मिळतील. सर्व अग्‍निवीरांना 48 लाखांचे विमा कवच असेल. कार्यकाळादरम्यान शहीद झाल्यास विम्याचे 48 लाख, सरकारकडून 44 लाख, संपूर्ण वेतन असे एकूण 1 कोटी रुपये कुटुंबीयांना मिळतील. नियमित सैनिकांप्रमाणे पुरस्कार, सन्मान मिळतील. सेवेदरम्यान अपंगत्व आल्यास 44 लाख रुपये मिळतील. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावाच लागेल.

आज पंतप्रधान सैन्यदल प्रमुखांना भेटणार

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्‍निपथ’ योजनेविरोधात देशभर आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (दि. 21) लष्कर, नौदल आणि हवाईदल प्रमुखांना भेटणार आहेत. अग्‍निपथ योजनेला होणारा विरोध आणि नंतर सैन्यदल प्रमुखांनी त्यावर केलेले भाष्य, या पार्श्‍वभूमीवर या भेटीकडे सर्वांचे लक्ष असेल. सर्वात आधी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार पंतप्रधानांची भेट घेतील, असे सांगण्यात येते.
निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी नाही

निवृत्तीनंंतर 10.04 लाख रुपये मिळतील. मासिक 30 हजार वेतनाच्या 30 टक्के रक्‍कम अग्‍निवीरांना भविष्यनिर्वाह निधीसाठी जमा करावी लागेल. एवढीच रक्‍कम सरकार दरमहा जमा करेल. अग्‍निवीरांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी
मात्र मिळणार नाही.

Back to top button