

मुंबई : आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कजवळ भरधाव ट्रक आणि विद्यार्थ्यांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या भीषण धडकेत किमान २३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात कोहोरा रेंजमध्ये राष्ट्रीय महामार्ग-७१५ वर झाला. ही घटना हाथीकुली टी इस्टेटजवळील रंगाजन परिसरात घडली, जिथे बहुतांश विद्यार्थ्यांसह एकूण ३५ प्रवाशांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हलर (ए.एस. ०२ एसी ६६९०) जोरहाटकडे जाणार्या कंटेनर ट्रक (के.ए. ०१ एटी ०९७७) ला धडकली. अपघातग्रस्त ट्रॅव्हलर बोकाखाटहून नागावच्या दिशेने जात होती. अपघातात दगावलेल्यांत ट्रॅव्हलरचा चालक व इतरांचा समावेश आहे. प्रवाशांत काझीरंगा कॉलेजचे काही विद्यार्थीही होते.
ही धडक इतकी भीषण होती की, प्रवासी वाहनाचा चक्काचूर झाला. अपघातात काही प्रवासी गाडीबाहेर फेकले गेले, तर काही आतच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. आसामचे कॅबिनेट मंत्री अतुल बोरा यांनीही घटनास्थळी पोहोचून जिल्हा प्रशासकीय अधिकार्यांना बचावकार्यात मदत केली.
गोलाघाटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, अपघात मोठा व भीषण आहे. आम्ही घटनास्थळी उपस्थित आहोत. बसमधून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. बसमधील प्रवाशांचा नेमका आकडा मात्र अद्याप समोर आलेला नाही.
अपघातातील जखमींना तातडीच्या उपचारांसाठी जवळच्या कोहोरा मॉडेल रुग्णालयात नेण्यात आले. तर, गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हलर खूप वेगाने धावत होती. पार्कजवळ लावलेल्या वेगमर्यादेच्या नियमांचे तिने उल्लंघन केले होते. ट्रॅव्हलरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ती कंटेनर ट्रकला जाऊन धडकली, असा प्राथमिक अंदाज आहे.