काश्मिरात 100 दहशतवाद्यांचा खात्मा | पुढारी

काश्मिरात 100 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू ; अनिल साक्षी : जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारीपासून ते आतापर्यंतच्या काळात भारतीय सुरक्षा यंत्रणांनी 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यात स्थानिक 71 आणि 29 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षातील पाच महिने आणि 13 दिवसांत 100 हून अधिक दहशतवादी मारले आहेत.

यात सर्वाधिक 63 दहशतवाही हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे तसेच त्यांचे ‘हिट स्क्वॉड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या द रेझिटन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तर 24 दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते. दरम्यान, या वर्षात 40 दहशतवाद्यांसह त्यांना मदत करणार्‍या 350 जणांनाही पडकण्यात आले आहे.

या वर्षात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या गतवर्षी म्हणजेच 2021 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या दुप्पट आहे. गतवर्षी 50 दहशतवादी मारले गेले होते. यात 49 स्थानिक आणि एका परदेशी दहशतवाद्याचा समावेश होता. गतवर्षी 24 ऑगस्ट रोजी 100 वा दहशतवादी मारला गेला होता. पोलिस महासंचालक विजयकुमार म्हणाले, गतवर्षी 100 वा दहशतवादी 24 ऑगस्ट रोजी मारला गेला होता.

सोपोरमधील चकमकीत तेव्हा तीन दहशतवादी ठार झाले होते. तर 2020 मध्ये 8 जून रोजी 101 वा दहशतवादी मारला गेला होता. या वेळी बहुतांश दहशतवादी दक्षिण काश्मिरमध्ये मारले गेले आहेत. अमरनाथची वार्षिक यात्रा पूर्णतः सुरक्षित बनविण्याच्या अभियानांतर्गत दहशतवादी आणि त्यांच्या संपूर्ण नेटवर्कविरोधात सातत्याने अभियान चालवले जात आहे. दहशतवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात विशेष चौक्या उभारल्या गेल्या आहेत, असेही ते म्हणाले.

हायब्रिड दहशतवाद्यांचा धोका

पोलिस महासंचालक विजयकुमार म्हणाले, दक्षिण काश्मीरमध्ये अनेक जिल्ह्यात हायब्रिड दहशतवाद्यांसह अनेक परदेशी दहशतवादी मोठ्या संख्येने असल्याच्या बातम्या आहेत. सुरक्षा यंत्रणांना सर्वाधिक धोका या हायब्रिड दहशतवाद्यांचाच आहे. हे दहशतवादी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगत असतात आणि कधीतरी ते अचानकच दहशतवादी म्हणून येतात आणि हल्ला करतात.

* मृतांमध्ये 71 स्थानिक, 29 परदेशी दहशतवादी
* सर्वाधिक 63 दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे
* 24 दहशतवादी जैश एक
* 40 दहशतवाद्यांना जीवंत पकडले

Back to top button