लडाख पूर्व सीमेवर चीनची लढाऊ विमाने

लडाख पूर्व सीमेवर चीनची लढाऊ विमाने

लडाख : वृत्तसंस्था
चीनने पुन्हा एकदा भारताशी आगळीक केली असून पूर्व लडाखच्या सीमेवरील होतान विमानतळावर 25 लढाऊ विमाने तैनात करण्यात आली. यामध्ये जे -20 आणि जे-11 या लढाऊ विमानांचा समावेश आहे. चीनने यापूर्वी पूर्व लडाखमध्ये मिग-21 सारखी विमाने तैनात केली होती.

चिनी हवाई दल भारतीय क्षेत्रात नवीन हवाई क्षेत्र निर्माण करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे कमी उंचीवर कारवाया करता येतील. जे-20 हे लढाऊ विमान तासात 2100 किलोमीटर अंतर पार करू शकते. होतान ते दिल्ली हे हवाई अंतर सुमारे 1 हजार किलोमीटर आहे. म्हणजेच जे-20 या विमानाला दिल्लीत पोहोचण्यासाठी केवळ अर्धा तास लागेल. चीनने काशगर, होतान आणि गारी गुंसा येथील एअरबेेस अपग्रेड केला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात येतील. गेल्या काही दिवसांत सीमेवर चीनने तैनात केलेल्या लढाऊ विमानांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
दरम्यान, लडाखजवळ चीनकडून आणखी एका पुलाची निर्मिती केली जात आहे. तेथून लष्करी वाहने जाऊ शकतील, असा चीनचा डाव आहे. चीनने यापूर्वी मार्चमध्ये एक छोटा पूल बांधला होता. त्याचा वापर सर्व्हिस ब्रीजसारखा केला जात आहे. चीन दोन्ही बाजूने पुलांच्या निर्मितीच्या तयारीत आहे. त्याचे अंतर दोन्ही देशांच्या सीमेपासून केवळ 20 किलोमीटरवर असल्याचे सांगण्यात आले.

12 बैठका होऊनही तंटा मिटलेला नाही

गलवान हिंसाचारानंतर भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून आतापर्यंत 12 पेक्षा अधिक बैठका झाल्या आहेत. मात्र, दोन्ही देशांतील तंटा मिटलेला नाही. सैनिकी चर्चेबरोबर राजदूत पातळीवरही चर्चा झाली आहे. तरीही चीनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून उलट सातत्याने चीनकडून भारताची कुरापत काढली जात आहे.

अमेरिकेचा चीनला इशारा

भारताच्या सीमेलगत चीनच्या सतत हालचाली सुरू आहेत. त्याबाबत अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयन ऑस्टिन यांनी चीनला कडक इशारा दिला आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता विस्तार आणि भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनकडून आपला दावा सातत्याने केला जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भारताची वाढती लष्करी क्षमता आणि तांत्रिक सामर्थ्यांचे कौतुकही त्यांनी केले.

भारतीय जवान चीन सीमेवर बेपत्ता

डेहराडून (उत्तराखंड) : अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवर तैनात असलेला भारतीय लष्करातील जवान प्रकाश सिंह राणा गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता आहे. राणा यांचे कुटुंब डेहराडून येथे राहते. सातव्या गढवाल रायफल्स बटालियनचा हा जवान 29 मेपासून बेपत्ता आहे. लष्कराने जवानाच्या पत्नीला फोनवरून ही माहिती दिलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news