अरेरे...! लेकीचा मृतदेह वडिलांनी नेला खांद्यावरून | पुढारी

अरेरे...! लेकीचा मृतदेह वडिलांनी नेला खांद्यावरून

भोपाळ : बिहारमध्ये मुलाचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी 50 हजार रुपये मागितल्याचे प्रकरण ताजे असताना आता मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारीएक घटना समोर आली आहे. 4 वर्षांच्या मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अखेर मुलीचा मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ तिच्या वडिलांवर आली. भर उन्हात ते आपल्या लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात होते.

मुलीला सोमवारी बक्सवाह आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथे तिची प्रकृती खालावली. त्यानंतर मंगळवारी कुटुंबीयांनी तिला लगतच्या दामोह येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली, परंतु ते ढिम्म राहिले.

खासगी वाहनासाठी पैसे नव्हते

मुलीचे वडील लक्ष्मण अहिरवार यांनी सांगितले की, आम्ही तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि बक्सवाहासाठी बसमध्ये चढलो. आमच्याकडे खासगी वाहनाची व्यवस्था करण्यासाठी पैसे नव्हते, बक्सवाह येथे पोहोचल्यानंतर त्यांनी नगर पंचायतीला एक वाहन उपलब्ध करून देण्यास सांगितले, जेणेकरून ते पौडी गावात मृतदेह घेऊन जातील. त्यांनीही नकार दिला. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दामोहच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ममता तिमोरी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

Back to top button