ड्रोनद्वारे बॉम्बहल्ल्याचा प्रयत्न उधळला

ड्रोनद्वारे बॉम्बहल्ल्याचा प्रयत्न उधळला
Published on
Updated on

जम्मू ; अनिल साक्षी : जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ला करण्याचा कट सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला आहे. ड्रोनद्वारे टिफिन बॉक्समध्ये ठेवलेले बॉम्ब आणि टायमर व इतर स्फोटके हस्तगत केली आहेत.

सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हे पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यावेळीही बीएसएफच्या सतर्क जवानांनी ड्रोनच्या हालचाली टिपत ड्रोन पाडण्यासाठी दोन ते तीन राऊंड फायर केले. पण हे ड्रोन पुन्हा पाकिस्तानी हद्दीत परतले. कानाचक्क सीमेजवळ सुमारे 800 फूट उंचीवर हे ड्रोन उडत होते. पाकिस्तानी हद्दीत परतण्यापूर्वी काही वस्तू या ड्रोनने भारतीय हद्दीत टाकल्या होत्या. या संशयामुळे येथे शोधमोहीम राबविण्यात आली.

यावेळी सीमेवर आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली. ही स्फोटके लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये ठेवली होती. त्यामध्ये चुंबकाचा वापर करून आयईडी बॉम्ब ठेवले होते. त्यात टायमरही होता. हे टाईम बॉम्ब होते. टायमरमध्ये विविध वेळा सेट केलेल्या होत्या. या डब्यांतून जवळपास 5 किलो आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर तातडीने बॉम्ब निकामी करणार्‍या पथकाला पाचारण केले गेले. जवानांनी यातील तिन्ही बॉम्ब निकामी केले.

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू ; पुढारी वृत्तसेवा : काश्मीरमध्ये मंगळवारी दोनवेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार झालेल्यांमध्ये राहुल भट या काश्मिरी पंडिताच्या मारेकर्‍याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

कुपवाडामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवादी ठार केले तर सोपोरमध्ये चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा समावेश असून यातील एक जण पाकिस्तानी आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिली.

बँक मॅनेजरच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून तो आणि त्याच्या मास्टरमाईंडला लवकरच पकडले जाऊ शकते अथवा त्यांचा चकमकीत खात्मा होऊ शकतो, असा दावा विजयकुमार यांनी केला आहे. जम्मू-काश्मीर खोर्‍यात टार्गेट किलिंगच्या माध्यमातून लोकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केले जात आहे. मात्र दहशतवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ दिले जाणार नसून नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी प्रभावी रणनीती तयार केली जात असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news