Varanasi Blasts Case : वाराणसी साखळी बाँबस्फोटातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा | पुढारी

Varanasi Blasts Case : वाराणसी साखळी बाँबस्फोटातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा

गाझियाबाद : पुढारी ऑनलाईन

गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायायलाने वाराणसी येथे २००६ ला झालेल्या साखळी बाँबस्फोटातील मुख्य सूत्रधार वलिउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या स्फोटात २८ लोकांचा बळी गेला होता तर १०० वर लोक जखमी झाले होते. ७ मार्चला बनारस हिंदू विद्यापीठाजवळील संकट मोचन मंदिर आणि वाराणसी कँटोन्मेंट येथे हे स्फोट झाले होते. न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी ही शिक्षा सुनावली.

वलिउल्लाह हा ४ मार्चला वाराणसी येथे दिसला होता आणि त्याला पाहाणारे दोन साक्षीदार होते. तर आणखी दोन साक्षीदारांनी वलिउल्लाहला एका बँगसह घटनास्थळी ७ मार्चला पाहिले होते. वलिउल्लाह दिसल्यानंतर जवळपास दीड तासांनी हे स्फोट झाले.

परिस्थितीजन्य पुराव्यात एक प्रकारची साखळी दिसून येते आणि त्यातून वलिउल्लाह याने हा स्फोट घडवल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. या स्फोटात घटनास्थळीच बऱ्याच जणांचा मृत्यू झाला होता.

५ एप्रिल २००६ला वलिउल्लाह याला अटक करण्यात आली. त्याच वेळी पोलिसांनी स्फोटक, शास्त्रस्त्रेही जप्त केली होती. शस्त्रास्त्रांच्या गुन्ह्यात त्याला १० वर्षांची कैद आणि १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

प्रयागराज येथील फुलपूरमधील एका रहिवाश्याने विलउल्लाहला आसरा दिला होता. या स्फोटातील अन्य तीन आरोपी झकारिया, मुस्तकिम आणि बशिर हे बंगलादेशी असून ते अजूनही फरार आहेत. तर पाचवा आरोपी मोहमंद जुबेर हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. ९ मे २००६ ला जुबेर सीमा पार करून पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होता.

Back to top button