चांद्रयान-२ नेही दिले चंद्रावरील पाण्याचे संकेत | पुढारी

चांद्रयान-२ नेही दिले चंद्रावरील पाण्याचे संकेत

डेहराडून ; वृत्तसंस्था : भारताच्या ‘चांद्रयान-१’ मोहिमेमुळेच चंद्रावरील पाण्याचा सर्वप्रथम छडा लागला होता. चंद्राभोवती भ्रमण करीत असलेल्या ‘चांद्रयान-२’ च्या ऑर्बिटरच्या ‘इमेजिंग इन्फ्रा रेड स्पेक्टोमीटर’ कडून आलेल्या प्रतिमा व आकडेवारीनुसार चांद्रभूमीवर हायड्रोक्सिल (पाण्याचे रेणू) म्हणजेच पाणी असण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

सन २०१९ मध्ये लाँच केलेल्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील ऑर्बिटर चंद्राभोवती भ्रमण करीत राहणार व त्यामधील लँडर चंद्रावर उतरून त्याच्यामध्ये असलेले रोव्हर चांद्रभूमीवर फिरण्याची योजना होती.

मात्र या लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नव्हते. तरीही ही मोहीम अनेक बाबतीत यशस्वी ठरली आहे. यानाचे ऑर्बिटर चंद्राभोवती भ्रमण करीत संशोधकांना अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती पुरवत आहे.

‘आयआयआरएस’चे संचालक प्रकाश चौहान यांनी म्हटले आहे की, चंद्रावर पाण्याचे संकेत २९ अंश उत्तरेपासून ६२ अंश उत्तरेपर्यंत मिळाले आहेत. ज्याठिकाणी सूर्यप्रकाश असतो, अशा ठिकाणी हे पाण्याचे संकेत आहेत. चंद्रावरील पाण्याची उपलब्धता ८०० ते १००० पीपीएम (पार्टस् पर मिलियन) आढळली आहे.

‘चांद्रयान-२’ने पाठवलेली आकडेवारी व प्रतिमा यांचे अधिक बारकाईने विश्लेषण केले जात आहे. त्यामधून भविष्यात चंद्राबाबतची महत्त्वाची माहिती समोर येऊ शकेल.

Back to top button