केंद्राचा उलटा कारभार; खतांच्या दरवाढप्रश्नी पवारांचे पत्र | पुढारी

केंद्राचा उलटा कारभार; खतांच्या दरवाढप्रश्नी पवारांचे पत्र

मुंबई: पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रसायन व खतेमंत्री सदानंद गौडा यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. सध्या कोरोनामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असताना ही दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

वाचा : भारतीय नौदलाच्या बचाव मोहिमेचा थरारक व्हिडिओ 

पवार यांनी लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकारचा खत दरवाढीचा निर्णय धक्कादायक असल्याचे नमूद केले आहे. या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार व्हावा व दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रात म्हटले आहे, देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. या लाटेचा तडाखा सर्वांनाच बसला आहे. शेतकऱ्यांसाठी तर हा आतापर्यंतचा सर्वाधिक कठीण काळ आहे. अशावेळी शेतकऱ्याच्या समस्यांकडे सरकारने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असताना त्याच्या उलट कारभार सुरू आहे. बळीराजाला मदतीचा हात देण्याऐवजी केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांत भर घालण्याचे काम केले आहे.’

वाचा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांचा बळी!

करोनामुळे देशातील अनेक भागांत सातत्याने लॉकडाऊन लावावे लागत आहे. त्यातून बाजार व्यवस्था कोलमडल्याने त्याचा मोठा फटका शेतमालाला आणि परिणामी शतेकऱ्याला बसला आहे. आता पावसाळा जवळ आला आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. अशावेळी खतांच्या वाढीव किंमतीमुळे शेतीवरील खर्चात आणखी वाढ होणार आहे. आधीच इंधनाचे दर वाढल्याने आर्थिक भार पडला असताना आता खत दरवाढ करून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केंद्र सरकारने केले आहे, असे पवार यांनी पुढे नमूद केले आहे. या प्रश्नी आपण व्यक्तिश: लक्ष घालून खतांच्या वाढीव किंमती पूर्ववत केल्यास मला आनंद होईल, अशी विनंतीही पवार यांनी सदानंद गौडा यांना केली आहे. 

वाचा : पेट्रोल दरात 27 पैशांची तर डीझेल दरात 29 पैशांची वाढ

Back to top button