देशातील १.८ टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित! | पुढारी

देशातील १.८ टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशातील 1.80 टक्के लोकसंख्या आतापर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत. विशेष म्हणजे देशात आताही एकूण लोकसंख्येपैकी 2 टक्के हून कमी कोरोनाबाधित आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेतून देण्यात आली.भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या 10 देशांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक असल्याचा दावा मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्याकडून करण्यात आला.

अमेरिका, ब्राझील,  फ्रान्स, तुर्की, रशिया, इटली, जर्मनी, अर्जेंटीना तसेच कोलंबियाच्या तुलनेत भारतात कमी कोरोनाबाधित आढळल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. परंतु, दररोज कोरोनामृत्यूच्या वाढत्या आकड्या संबंधी काय कारणे आहेत, यासंबंधी कुठलीही माहिती अग्रवाल यांच्या कडून देण्यात आली नाही.

अग्रवाल म्हणाले की, देशातील 22 राज्यात अजूनही कोरोना संसर्ग दर 15 टक्क्यांहून अधिक आहे. 8 राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांहून अधिक आहे. तर, 18 राज्यात 50 हजारांहून कमी सक्रिय कोरोना बाधित आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच गुजरात मध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 13 राज्यातील संसर्ग दर 5 ते 15 टक्क्यांदरम्यान आहे.

देशातील कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.सक्रिय कोरोना बाधितांची संख्या त्यामुळे कमी होऊन 13.3 टक्के पर्यंत आला आहे. गेल्या तीन आठवड्यात 199 जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून आली आहे. 3 मे ला 80.17 टक्के असलेला कोरोनामुक्ती दर आता 85.6 टक्क्यापर्यंत पोहोचल्याचे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

अग्रवाल यांनी कमी लोकसंख्या असलेल्या ज्या देशांसोबत भारताची तुलना केली आहे त्यात अमेरिका 10.1 टक्के, ब्राझील 7.3 टक्के, फ्रान्स 9 टक्के, तुर्की 6 टक्के, रशिया 3.4 टक्के, इटली 7.4 टक्के, जर्मनी 4.3 टक्के, अर्जेंटीना 7.3 टक्के तसेच कोलंबिया मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 6.1 टक्के नागरिक कोरोना बाधित झाले.

Back to top button