कोरोना मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार! | पुढारी

कोरोना मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये भरपाई दिली जाईल, अशी घोषणा मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा 2,500 रुपये देण्यासह वयाच्या 25 वर्षांपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा खर्चही केजरीवाल सरकार उचलणार आहे.

केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील 72 लाख रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप केले जाईल. केंद्र सरकारकडूनही या रेशन कार्डधारकांना 5 किलो धान्य मोफत मिळणार आहे. त्यामुळे या महिन्यात या रेशन कार्डधारकांना दहा किलो धान्य मोफत मिळेल. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, ज्यांचे रेशन कार्ड अद्याप बनलेले नाही, त्यांनाही दिल्ली सरकार धान्य वितरण करणार आहे. यासाठी कागदपत्रे लागणार नाहीत. एकुलत्या कमावत्या सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबांना दिल्‍ली सरकार 50 हजार रुपये सानुग्रह अनुदानासह मुलांना दरमहा 2,500 रुपये देणार आहे.

कोरोना अनाथांना मध्य प्रदेशात दरमहा 5 हजार रुपये

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांच्या निराधार मुलांना मासिक 5 हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. मध्य प्रदेशपाठोपाठ अशाप्रकारची योजना जाहीर करणारे दिल्ली हे आता दुसरे राज्य ठरले आहे.

 

Back to top button