कोरोना : बाबा रामदेवांच्या औषधाला मान्यता नाही; तरीही केंद्रीय मंत्री वाटताहेत ‘कोरोनिल’ | पुढारी

कोरोना : बाबा रामदेवांच्या औषधाला मान्यता नाही; तरीही केंद्रीय मंत्री वाटताहेत 'कोरोनिल'

नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन 

योगगुरू बाबा रामदेव यांनी जेव्हा कोरोनावरील औषध लाॅन्च केले, तेव्हा सर्वस्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती. भारतात पतंजलिच्या ‘कोरोनिल’ या औषधालाही कोरोनावरील उपचारासाठी मान्यता देण्यात आलेली नाही. इतकंच नाही, तर डाॅक्टरांच्या संघटनांनीही त्या औषधाला विरोध केलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही मान्यता देण्यात आलेली नाही. असं असताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल हे निर्धास्तपणे बाबा रामदेवच्या ‘कोरोनिल किट’चे वाटप करत आहेत.

वाचा ः गॅलापागोस बेटावरील जगप्रसिद्ध ‘डार्विन्स आर्च’ कोसळली समुद्रात!

शिक्षण मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “हरिद्वारमधील २५०० कोरोनाबाधित रुग्णांना सामान्य पद्धतीने होत असलेल्या उपचाराबरोबर ‘कोरोनिल’देखील देण्यात यायला हवे”, अशा आशयाचे ट्विट करण्यात आले आहे. खरंतर आयसीएमआरच्या कोरोना उपचारांसंदर्भात असणाऱ्या मार्गदर्शक यादीमध्ये ‘कोरोनिल’ या औषधाचा साधा उल्लेखही केलेला नाही.  त्यानंतर १७ मे रोजी संशोधन करून जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही पतंजलिचा उल्लेख केलेला नाही. आता प्रश्न असा आहे की, जेव्हा सरकारकडून या दाव्याला मान्यता दिली गेलेली नाही, तर सरकारमधील मंत्री या औषधाचे वाटप का करत आहेत? 

वाचा ः हिंद महासागरात आढळला ‘डायनासोर’ युगातील जिवंत मासा

जेव्हा कोरोनिल औषध लाॅन्च केले होते, तेव्हा बाबा रामदेव यांच्यासोबत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यानंतर विरोधी पक्षांकडून यासंदर्भात आवाज उठविण्यात आला.  “जे औषध प्रमाणितच झालेले नाही, त्या औषधाच्या लाॅन्चिंगमध्ये सरकारमधील मंत्री का उपस्थित आहेत”, असा प्रश्न विरोधा बाकावरून उपस्थित करण्यात आला. असे असतानाही बाबा रामदेव यांनी दावा केला होता की, जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’चे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर डब्ल्यूएचओनं बाबा रामदेवचा हा दावा फेटाळून लावला होता. 

वाचा ः ‘लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी इतर कंपन्यांना निर्मितीची मुभा द्या’

इतकं सगळं होऊनही बाबा रामदेव पुन्हा-पुन्हा दावा करतात की, हे औषध रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. डब्ल्यूएचओनं स्पष्ट सांगितलं आहे की, कोणताही पारंपरिक औषधांना कोरोनासंदर्भात मान्यता देण्यात आलेली नाही. यावर पंतजलिचे आयुर्वेदचे स्वामी बालकृष्ण यांनी सांगितलं आहे की, डब्ल्यूएचओ हे कोणत्याही ओषधाला मान्यता किंवा नकार देण्याचं काम करत नाही. बाबा रामदेव यांचं म्हणणं असं आहे की, कोरोनिल हे औषध घेतल्यानंतर श्वास घेण्यात अडचण निर्माण होत नाही. हे औषध कोरोनाच्या उपचारांवर कोणत्याही प्रकारे उपयोगात येत नाही, त्यामुळे याचा प्रचार केला जाऊ शकत नाही, असे सांगून भारत सरकारनेदेखील या औषधांच्या मार्केटिंगवर बंदी घातली आहे. असं असलं तरीही प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या संदर्भात आजही हे औषध बाजारात मिळत आहे.  

Back to top button