सोशल मीडियावरील जाहिरात डॉक्टरांना महागात पडणार | पुढारी

सोशल मीडियावरील जाहिरात डॉक्टरांना महागात पडणार

नवी दिल्ली; जाल खंबाटा : सध्या सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याचा फंडा सर्व स्तरांतील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात करत असतात. वैद्यकीय व्यावसायिकही त्याला अपवाद नाहीत. मात्र, हा प्रकार डॉक्टर्सना महागात पडणार आहे. लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार्‍या डॉक्टरांचा परवानाच निलंबित करण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) त्यासाठी एक नवी आचारसंहिता जारी केली आहे.

वैद्यकीय व्यावसायिकांना अनेक दशकांपासून जाहिराती किंवा कोणत्याही स्वरूपात मार्केटिंग करण्याची बंदी आहे; पण अनेक जण वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यातच सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचे तंत्र विकसित झाले आहे. त्यामुळे एका क्लिकवर हजारो लोकांपर्यंत पोहोचता येते. वैद्यकीय व्यावसायिकही त्याचा वापर करीत आहेत. त्यासाठी सोशल मीडिया साईट्स आणि अ‍ॅप्सचा वापर केला जात आहे. हा प्रकार न थांबवल्यास ‘एनएमसी’ संबंधित व्यावसायिकांविरोधात कठोर पावले उचलणार आहे. विशेषत:, फी देऊन एखाद्या एजन्सीजचा वापर करून लाईक्स आणि फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा करणार्‍यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नव्या आचारसंहितेतील महत्त्वाचे मुद्दे

  • सोशल साईट्सच्या माध्यमातून उपचार किंवा औषधे लिहून देण्यास बंदी
  • गरजू रुग्णाने मदत मागितल्यास सोशल साईट्सऐवजी टेलिमेडिसिनद्वारे उपचार करता येतील
  • रुग्णांच्या चाचण्यांचे रिपोर्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर करता येणार नाहीत
  • उपचार होऊन ठीक झालेल्या रुग्णांचे व्हिडीओ किंवा छायाचित्रे प्रदर्शित करण्यास बंदी
  • स्पेशलायझेशन असलेले डॉक्टर इतर डॉक्टर्सना उपचार पद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकतील
  • रुग्णांची दिशाभूल होणार नाही, अशी महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर देता येईल

Back to top button