नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : जागतिक सरासरी तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसच्या आत ठेवण्यासाठी जग प्रयत्नशील असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील इंटर गव्हर्न्मेंट पॅनेल (आयपीसीसी) ने धोक्याचा इशारा दिला आहे. आगामी दोन दशकांत जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सिअसने किंवा त्याहीपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असून, वेगाने हिमखंड वितळण्याबरोबरच सागरी तापमानही वेगाने होणार आहे.
त्यामुळे जगाला विनाशकारी संकटांचा सामना करावा लागणार आहे. या तापमानवाढीमुळे हिंद महासागर आणि हिमालयीन पर्वतरांगांमधील संकटेही उचल खाणार आहेत.
किमान तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार असल्यामुळे ऋतुमानातही बदल होणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस वाढतील तसेच नेहमीपेक्षा या ऋतूतील तापमान जास्त राहील, उष्णतेच्या लाटा वाढतील आणि हिवाळ्याच्या दिवसांत घट होईल. तापमानवाढीमुळे हिमालयातील प्रदेशात हिमनद्या वेगाने वितळतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तापमानवाढीला जबाबदार असणार्या वायूंचे उत्सर्जन ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहता दशकभरातच तापमानवाढीची मर्यादा ओलांडलेली असेल. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस समुद्रपातळी जवळपास 2 मीटरने वाढेल, ही शक्यताही नाकारता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भारताच्या द़ृष्टीने विचार केला, तर या शतकाच्या प्रारंभीपासूनच हिमालयावरील बर्फाचे आवरण कमी होत आहे. 1970 पासून हिमनद्यांचे स्वरूपही बदलत आहे. त्यांचे वस्तुमान कमी झाले आहे. त्यामुळे या धोक्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बर्फाच्छादित क्षेत्र आणि बर्फाचे प्रमाण कमी होत राहील, उत्सर्जन वाढल्याने हिमनद्यांवर विपरीत परिणाम होणार आहे.
वाढते जागतिक तापमान आणि पावसामुळे हिमसरोवरे फुटण्याच्या धोक्याबरोबरच भूस्खलनाच्या घटना वारंवार होऊ शकतात, असा इशारा 'आयपीसीसी'ने दिला आहे. तथापि, काराकोरम रांगातील हिमनद्यांमध्ये फार मोठ्या बदलाची शक्यता नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारताला अलीकडेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या उंच पर्वतीय क्षेत्रांत पूर आणि भूस्खलन आपत्तींचा सामना करावा लागला आहे. उत्तराखंडमध्ये 7 फेब्रुवारीला हिमखंड फुटल्याने ऋषिगंगा आणि धौलीगंगा खोर्यांमध्ये अचानक पूर आला. ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प आणि राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा तपोवन विष्णुगड प्रकल्प वाहून गेला.
या आपत्तीमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हवामानावर होणार्या या परिणामांसाठी मानवच जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तथापि, हरितवायू उत्सर्जनात मोठी घट केल्यास वाढत्या तापमानवाढीला आळा घालता येईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.