मुंबई सह 12 शहरे 3 फुटांपर्यंत बुडतील | पुढारी

मुंबई सह 12 शहरे 3 फुटांपर्यंत बुडतील

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे भारतातील विनाशाबद्दल भीती व्यक्त केली आहे. या अहवालात 80 वर्षांनंतर म्हणजेच 2100 पर्यंतचे भारताचे चित्र दर्शवण्यात आले आहे. समुद्राची पातळी वाढल्यामुळे भारतातील मुंबई सह 12 किनारपट्टीची शहरे 3 फुटांपर्यंत पाण्यात बुडतील.

सततच्या उष्णतेमुळे ध्रुवांवर गोठलेले बर्फ वितळल्यामुळे हे घडेल असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील इंटर गव्हर्न्मेंट पॅनेल (आयपीसीसी) च्या अहवालाच्या आधारे नासाने ही भीती व्यक्त केली आहे.

आगामी दोन दशकांत जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सिअसने किंवा त्याहीपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असून, वेगाने हिमखंड वितळण्याबरोबरच सागरी तापमानही वेगाने होणार आहे, असे आयपीसीसीच्या अहवालात म्हटले आहे. याचा सर्वांत मोठा परिणाम भारतीय किनारपट्टीवरील शहरांना बसेल.

यामध्ये ओखा, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मुंबई, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, तुतीकोरन, कोची, पारादीप आणि पश्चिम बंगालच्या किद्रोपूर किनारपट्टी भागांचा समावेश आहे. त्यामुळे भविष्यात तेथील लोकवस्ती स्थलांतरित करावी लागेल, असा दावा नासाने या अहवालात केला आहे.

नासाने तयार केले सी लेव्हल प्रोजेक्शन टूल

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने समुद्रसपाटीच्या प्रक्षेपणाचे साधन तयार केले. या साधनामुळे समुद्रकिनार्‍यावरील लोकांना आपत्तीपासून आवश्यक व्यवस्था करण्यात मदत होणार आहे. त्यासोबतच लोकांना वेळेत बाहेर काढण्यात यामुळे मदत मिळणार आहे. या ऑनलाइन साधनाद्वारे कोणीही भविष्यातील आपत्ती म्हणजेच समुद्राची वाढती पातळी जाणून घेऊ शकणार आहे.

समुद्रासह सपाटी प्रदेशालाही धोका

नासाने इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंजच्या (आयपीसीसी) अहवालाचा हवाला देत जगभरातील अनेक शहरे पाण्याखाली बुडतील, असा इशारा दिला आहे. वर्ष 2100 पर्यंत जगाच्या तापमानात लक्षणीय वाढ होईल. याप्रसंगी लोकांना भयंकर उष्णता सहन करावी लागेल. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण थांबवले नाही तर तापमान सरासरी 4.4 डिग्री सेल्सियसने वाढेल.

Back to top button