

पुढारी ऑनलाईन डेस्क: Warmest Year 2024 | जागतिक हवामान संघटनेने (WMO) सहा आंतरराष्ट्रीय डेटासेटच्या आधारे २०२४ हे वर्ष रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष असल्याची पुष्टी केली आहे. गेल्या दहा वर्षांत विक्रमी तापमानाच्या असाधारण मालिकेत 2024 हे वर्ष टॉप टेनमध्ये होते.
युरोपियन हवामान एजन्सी कोपर्निकसने शुक्रवारी (दि.१०) पुष्टी केली होती की, २०२४ हे वर्ष रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष होते. त्यानंतर 'जागतिक हवामान संघटने'ने देखील नुकतेच जागतिक सरासरी तापमान पूर्व पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअस होते. सन १८५० मध्ये जागतिक तापमानाची नोंद सुरू झाल्यापासून २०२४ सर्वांत उष्ण वर्ष ठरल्याचं जगभरातील अनेक हवामान संस्थांनी म्हटले आहे.
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (C3S) मधील शास्त्रज्ञांच्या मते, १८५० मध्ये जागतिक तापमानाचा मागोवा घेण्यास सुरुवात झाल्यापासून २०२४ हे सर्वात उष्ण वर्ष होते. मागील वर्षातील जानेवारी ते जून २०२४ हा प्रत्येक महिना त्या महिन्यांतील सर्वात उष्ण होता. ऑगस्ट वगळता जुलै ते डिसेंबर हा प्रत्येक महिना २०२३ नंतरचा सर्वात उष्ण महिना होता, असे जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
सन २०२४ मधील जागतिक तापमानाचे सरासरी प्रमाण १५.१ अंश सेल्सिअस होते. ते १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा ०.७२ अंशानी जास्त होते. तसेच २०२३ च्या मागील विक्रमापेक्षा देखील तापमान ०.१२ अंशाने जास्त असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी नोंदवले की, २०२४ मधील सरासरी तापमान १८५०-१९०० च्या बेसलाइनपेक्षा १.५५ अंश सेल्सिअस जास्त होते. संपूर्ण कॅलेंडर वर्षात सरासरी जागतिक तापमान १८५०-१९०० च्या सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सिअस जास्त राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पॅरिस करारात नमूद केलेल्या १.५ अंश सेल्सिअस तापमान मर्यादेचे कायमचे उल्लंघन म्हणजे २० किंवा ३० वर्षांच्या कालावधीत होणारी दीर्घकालीन तापमानवाढ. असं असलं तरी, तज्ञांना वाटतं की जग आता अशा टप्प्यात प्रवेश करत आहे जिथे तापमान सातत्याने या मर्यादेपेक्षा जास्त असेल.