वाराणसी, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौर्यावळी पंतप्रधान किसान योजनेतून 9 कोटी 26 लाख शेतकर्यांच्या खात्यात 17 व्या हप्त्याअंतर्गत 20 हजार कोटींचा निधी हस्तांतरित केला.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मोदी यांनी बळीराजाच्या निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. शपथ घेतल्यानंतर मोदी आपल्या मतदारसंघात प्रथमच आले होते. यावेळच्या सोहळ्यात मोदी यांच्या हस्ते शेतकर्यांच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात आला. यानंतर मोदी यांनी स्वयंसहाय्यता गटातील 30 हजार कृषी सखींना प्रमाणपत्राचे वाटप केले. याप्रसंगी मोदी म्हणाले, पंतप्रधानपदाची तिसर्यांदा शपथ घेतल्यानंतर त्वरित शेतकर्यांच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली.
शेतकर्यांचे कल्याण हेच आमच्या सरकारचे ब्रीद आहे. यापुढील काळात शेतकर्यांसाठी खूप काम करायचे आहे. कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करायच्या आहेत. त्यामुळे आपल्या तिसर्या कार्यकाळात बळीराजाच्या हितासाठी मोठे योगदान देण्यात येणार आहे, असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. 2019 साली मोदी वाराणसीमधून 4.80 लाख मताधिक्याने विजयी झाले होते. या लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा विजय एक लाख 52 हजारांवर मताधिक्याने झाला.
यावेळी ते म्हणाले, 18 व्या लोकसभेची निवडणूक ही भारतीय लोकशाहीची भव्यता आहे. भारताच्या सामर्थ्याचे दर्शन या निवडणुकीच्या माध्यमातून जगाला झाले आहे. या निवडणुकीत देशातील मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन निकालानंतर जनादेश दिला. शेतकरी, युवा, महिला आणि गरिबांच्या कल्याणसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे सरकारचा शपथविधी झाल्यानंतर शेतकरी आणि गरिबांच्या फाईलवर स्वाक्षरी केली. गरिबांना तीन कोटी नवीन घरे बांधून देण्यात येणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या समवेत मोदी यांनी दशाश्वमेध काठावर गंगाकाठी आरती केली.
शेतकरी सन्मान निधी योजना 2019 साली सुरू करण्यात आली. आतापर्यंत शेतकर्यांना 16 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. अल्पभूधारक शेतकर्यांच्या खात्यावर या योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. ही रक्कम दोन हजारप्रमाणे तीन टप्प्यात जमा करण्यात येते.
गंगा मातेने दत्तक घेतल्यासारखे वाटते
गंगा मातेने मला दत्तक घेतल्यासारखे वाटत असल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. सलग तिसर्यावेळी वाराणसी मतदारसंघातील मतदारांनी मोदी यांना निवडून देऊन विक्रम केला आहे. वाराणसीवासीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मोदी भावूक झाले होते. यावेळी ते म्हणाले, वाराणसीतील मतदारांनी आपणास सलग तीनवेळा निवडून दिले आहे. त्यांनी मला केवळ खासदार नव्हे, तर तीनवेळा पंतप्रधान केले आहे. त्यामुळे गंगा मातेने मला दत्तक घेतल्यासारखी भावना मनात दाटून आली असल्याचे मोदी यांनी नमूद केले.