

UP Barabanki Stampede
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिराबाहेर सोमवारी विजेच्या धक्क्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर सुमारे ४० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना घडली जेव्हा विजेची तार शेडवर पडली. यामुळे अनेकांना विजेचे धक्के बसले. श्रावणानिमित्त सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी ही घटना घडली.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणानिमित्त सोमवारी अवसानेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरात जलाभिषेका सुरु असताना काही माकडांनी मंदिरातील टिन शेडवर उडी मारली. यामुळे विजेची तार तुटली आणि ती शेडवर पडली. ही विजेची तार पडताच त्यातील वीज प्रवाह शेडमध्ये पसरला. यामुळे गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे २-२.३० वाजण्याच्या सुमारास घडली जेव्हा मंदिरात जलाभिषेक विधीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माकडांमुळे जुन्या विद्युत तारांचे नुकसान झाले होते. यामुळे विजेचा धक्का बसला असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी दिली.
"भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. काही माकडांनी ओव्हरहेड विजेच्या तारांवर उडी मारली. यामुळे विजेच्या तारा टीन शेडवर पडल्या. परिणामी, अनेक भाविकांना विजेचा धक्का बसला. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे," असे त्रिपाठी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी जिल्ह्यातील श्री अवसानेश्वर महादेव मंदिर परिसरातील दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मदतकार्य तातडीने करण्याचे आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.